|Sunday, August 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आघाडीचा निर्णय तालुकाध्यक्ष ठरवणारः जयंत पाटील

आघाडीचा निर्णय तालुकाध्यक्ष ठरवणारः जयंत पाटील 

प्रतिनिधी/ सांगली

राष्ट्रवादी पक्षांने अजूनही समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याचे धोरण ठेवले आहे. पण त्यासाठी प्रत्येक तालुकाअध्यक्षांचे मत घेतल्याशिवाय आपण त्यावर कोणताही निर्णय घेवू शकत नाही. त्यामुळे आता हा निर्णय घेण्यासाठी तालुका अध्यक्षांचे मत मागविण्यात आले असल्याची माहिती माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिली. तसेच दुष्काळी जनतेला पाण्यासाठी टाहो फोडण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. त्यामुळे जनताच आता या सरकारला धडा शिकवेल असे ही त्यांनी सांगितले

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गेल्या तीन दिवसापासून जयंत पाटील हे सांगलीच्या राष्ट्रवादी कार्यालयात तळ ठोकून आहेत. सोमवारी या मुलाखती संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक गोष्टी स्पष्ट केल्या.

जयंत पाटील म्हणाले राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी ठरविले आहे की समविचारी पक्षांच्याबरोबर आघाडी करा त्यानुसार आम्ही जिल्हय़ात काँग्रेसला आघाडीसाठी प्रस्ताव जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्यामार्फत दिला होता. त्यानिमित्ताने एक बैठकही झाली. पण काँग्रेसने त्यांच्या कार्यकर्त्य़ांचे मत जाणून घेतल्याशिवाय आपण काहीही बोलणार नाही असे सांगितले आहे. त्यामुळे पुढील बैठक त्यांनी सांगितल्यानंतर होणार आहे.

आम्ही आमच्या कार्यकर्त्य़ांची मते जाणून घेतली

दरम्यान गेल्या तीन दिवसाच्या कालावधीत आम्ही निवडणुकीसाठी इच्छुक असणारे आणि आमच्या पक्षांचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांची मतेही आम्ही जाणून घेतली आहेत. त्यामध्ये वेगवेगळी मते आमच्या समोर आली आहेत. त्यामुळे आम्ही आता या आघाडीबाबत तालुका अध्यक्षांना सांगितले की तुम्हाला आघाडी करू वाटते का याची माहिती आम्हाला दय़ा मगच आम्ही त्यापध्दतीने पुढे  चर्चा करू शकतो आणि त्यानुसार आमची वाटचाल सुरू आहे.

25 जानेवारीला मुंबईत बैठक त्यानंतर अंतीम चर्चा होईल

25 जानेवारी रोजी मुंबईत प्रदेश कार्यालयात राज्यातील सर्व जिल्हय़ातील जिल्हाध्यक्ष तसेच वरिष्ठ नेत्यांची एकत्रित बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक विषयावर चर्चा होईल तसेच त्यामध्ये आघाडी करायची की नाही याबाबतही बोलणे होणार आहे. त्यामुळे आता आघाडीची चर्चा ही 25 जानेवारीनंतरच आम्ही करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पाणी देण्यास टाळणाऱयांना जनता धडा शिकवेल

गेल्या अनेक दिवसापासून दुष्काळी भागातील जनतेने पाणी सोडा असे अनेकवेळा सांगितले होते. पण हे पाणी सोडण्यास जाणूनबुजून सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. हे करण्याच्या मागचे राजकारण ही आता जनतेला समजले आहे. त्यामुळे जनतेचा जो पाण्याचा आक्रोश आहे तो आता मताच्या पेटीतून सरकारला निश्चितच समजून जाईल असे त्यांनी सांगितले. आता पाणी पुन्हा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे जनता त्याबाबत निश्चित विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, माजी सभापती आप्पासाहेब हुळळे उपस्थित होते.

Related posts: