|Monday, June 17, 2019
You are here: Home » क्रिडा » वृद्धिमान संघासाठी पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक

वृद्धिमान संघासाठी पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक 

राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांची ग्वाही, पार्थिवचा प्रवासही प्रगल्भतेच्या दिशेने

वृत्तसंस्था/ मुंबई

वृद्धिमान साहा हा आमच्यासाठी पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असून आगामी कसोटी सामन्यांमध्ये तो संघात निश्चितपणाने परतेल. सध्या इराणी चषक स्पर्धेत आम्ही फक्त तंदुरुस्ती आजमावण्यासाठी त्याला खेळवले होते, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिली. ‘दुखापतीतून सावरलेल्या प्रत्येक खेळाडूला प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये तंदुरुस्ती सिद्ध केल्यानंतर राष्ट्रीय संघात परतता येईल, हे आम्ही यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यानुसार, साहाला प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळणे भाग होते’, असे ते पुढे म्हणाले.

‘सध्या आमच्यासाठी साहा प्रथम पसंतीचा व पार्थिव पटेल दुसऱया पसंतीचा यष्टीरक्षक आहे. साहा यापूर्वी केवळ दुखापतीमुळे संघाबाहेर होता. फॉर्म नसल्यामुळे त्याला डच्चू दिला गेला, असा याचा अर्थ घेऊ नये. न्यूझीलंडविरुद्ध कोलकाता कसोटीत साहा सामनावीर ठरला. शिवाय, वेस्ट इंडीजमध्ये त्याने शानदार शतकही झळकावले होते’, असे एमएसके यांनी यावेळी नमूद केले.

पार्थिव पटेलच्या लढवय्या, यशस्वी पुनरागमनाचेही त्यांनी कौतुक केले. ‘पार्थिवने पुनरागमनाची संधी मिळाल्यानंतर ती संधी सार्थ ठरवली. गुजरात विजयाच्या आसपासही नसताना त्याने संघाला रणजी जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारुन दाखवले. त्याचे यष्टीरक्षण सुधारले आहे. मात्र, साहा त्याच्यापेक्षा सरस यष्टीरक्षण करु शकत असल्याने आम्ही त्याला संधी दिली आहे’, असे ते म्हणाले.

‘साहा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक-फलंदाज का आहे, हे त्याच्या प्रदर्शनावरुन स्पष्ट होते. गुजरातचा संघ 4 बाद 63 अशा बिकट स्थितीत झगडत असताना तो मैदानात आला आणि त्याने गुजरातच्या तोंडातील विजयाचा घास काढून घेतला. याशिवाय, सध्या साहा व पार्थिव यांच्यात संघात जागा संपादन करण्यासाठी जी निकोप स्पर्धा रंगत आहे, त्याचे स्वागतच करायला हवे’, असे एमएसके प्रसाद यांनी शेवटी नमूद केले.