|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » काँग्रेस बलवान, इनकमिंगची गरज नाही

काँग्रेस बलवान, इनकमिंगची गरज नाही 

कोल्हापूर

जिह्यात काँग्रेस पक्ष बलवान आहे. त्यामुळे आगामी जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेसलाच बहुमत मिळणार आहे. पण ज्यांची जिह्यामध्ये केवळ 5 ते 10 टक्के ताकद आहे, त्यांनाच इनकमिंगची गरज आहे, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी भाजपचे नाव न घेता लगावला. नगरपालिका निवडणुकांमध्ये यश मिळाले असल्याचे भाजपकडून सांगितले जात असले तरी, त्यांच्याकडील अनेक विजयी उमेदवार हे मुळचे काँग्रेसमधीलच असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये मंगळवारी जि.प आणि पं.स. निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीनंतर आयोजित पत्रकार बैठकीमध्ये ते बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील कार्यकर्ते आयात करून  भाजपकडून जिल्हापरिषदेवर सत्ता आणण्याचे स्वप्न पाहीले जात आहे. त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना घेऊन निवडणूक लढवावी असे त्यांना आव्हान करतो. काँग्रेसकडून आजही निवडणूक लढवण्याऱयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न निवडणूक समितीपुढे पडला आहे. जिह्यामध्ये जनसुराज्य, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी आदी पक्षांबरोबर स्थानिक आघाडी करण्याची चर्चा सुरु आहे. या आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाकडून 50 पेक्षा अधिक जागा लढवल्या जाणार आहेत. चंदगड तालुक्यात नरसिंगराव पाटील, भरमू पाटील आणि संभाजी पाटील हे एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनंसार समविचारी पक्षांशीच आघाडी केली जाणार आहे. जातीयवादी पक्षांशी युती केली जाणार नसल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. काँग्रेसकडून निश्चित झालेल्या उमेदवारांची यादी 30 जानेवारीला जाहीर करण्याबाबत प्रदेश काँग्रेसकडून सूचना आल्या आहेत. त्यापूर्वीच नावे जाहीर करण्याबाबत प्रदेश काँग्रेसकडून परवानगी मिळाल्यास 27 जानेवारीला उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.

जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील म्हणाले, जिल्हापरिषदेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जनता दल आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आघाडी करून निवडणूक लढवली होती. यावेळीही जनता दल, आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी चर्चा सुरु आहे. पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाशी आघाडी केली जाणार आहे. तर राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची की नाही याबाबत स्थानिक पातळीवरच निर्णय घेण्याच्या सूचना प्रदेश काँग्रेसने दिल्या आहेत. जिह्यामध्ये कोठेही भाजपशी स्थानिक आघाडी केली जाणार नाही.  इच्छूकांची संख्या मोठी आहे. केवळ कागल तालुक्यातच इच्छूक कमी असून ते जिल्हा काँग्रेसला मान्य आहे. गेल्या निवडणूकीत काँग्रेसला 31 आणि आघाडीसह 34 जागांवर यश मिळाले. यावेळीही जिल्हापरिषदेवर काँग्रेसचाच झेंडा फडकेल असा विश्वास पी.एन.पाटील यांनी व्यक्त केला. राधानगरीमध्ये काँग्रेसकडून शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्याशी आघाडी केली जाणार आहे काय ? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावेळी प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जून आबिटकर यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, आम्ही उमेदवारी द्यायला तयार आहे, असे पी.एन.पाटील असे सांगून शिवसेनेशी आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले. इच्छूक उमेदवारांपैकी जे उमेदवार मेरिटचे आहेत, त्यांची नावे फायनल केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

           डॅशींग युवा कार्यकर्त्यांना उमेदवारी देणार

जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक उच्चशिक्षित, डॅशींग युवा कार्यकर्त्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. अशा इच्छूकांना उमेदवारी देण्याबाबत पक्ष सकारात्मक असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

              महादेवराव महाडिकांचा विषय टाळला

    आमदार महादेवराव महाडिक हे अद्यापही काँग्रेसमध्येच असल्याचे सांगतात. त्यामुळे खरोखरच ते काँग्रेसमध्ये आहेत काय ? असा प्रश्न पत्रकारांनी आमदार सतेज पाटील यांच्यासमोर उपस्थित केला. यावेळी आमचे चांगले चालले आहे, हा विषय मध्येच कशाला घुसडताय, त्यावर न बोललेलेच बरे असे सांगून आमदार सतेज पाटील यांनी महाडिकांच्या विषयावर भाष्य करणे टाळले.

       … तर सतेज आणि मी दोघेही रथातून जिल्हाभर फिरू !

  काँग्रेसमधील अंतर्गत धूसफूस संपली काय ? सतेज पाटील आणि आपण एकदिलाने काम करणार काय ? असा प्रश्न पत्रकारांनी जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांच्यासमोर उपस्थित केला. तसेच आपण दोघे एक झालात, तर जिह्यात काँग्रेसच्या पन्नासपेक्षा जास्त जागा निवडून येतील, असे सांगत पत्रकारांनी पी.एन.पाटील आणि सतेज पाटील यांचा चिमटा काढला. याबाबत बोलताना पी.एन.पाटील म्हणाले, सतेज आणि मी एकदिलानेच काम करत आहे. तसेच आम्ही दोघेजण एकत्र फिरल्यानंतर जर काँग्रेसला 50 जागांवर यश मिळत असेल, तर आम्ही दोघेही पुढील महिनाभर घरी न जाता रथातून जिल्हाभर फिरेल अशी कोपरखळी पी.एन.पाटील यांनी मारली.

 

Related posts: