|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आरोग्य निरीक्षकांनी दिले गाय-वासरूला जीवदान

आरोग्य निरीक्षकांनी दिले गाय-वासरूला जीवदान 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

प्रतिभानगर हॉल शेजारील मोकळय़ा जागेत एका गाईला प्रसुतीच्या वेदना होत होत्या. प्रसव वेदनेमुळे तिची तडफड सुरु होती. या गाईची ही अवस्था पाहून   महापालिकेचे प्रतिभानगर ई-1 वॉर्डचे आरोग्य निरीक्षक शशीकांत साठे यांनी प्रसंगावधान राखून स्वतः गायीची प्रसुती करत गाईसह वासरला जीवदान दिले. 

    प्रतिभानगर हॉल शेजारील मोकळय़ा जागेमध्ये मंगळवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास एक गाय तडफडत असल्याचे स्थानिक नागरीकांच्या निदर्शनास आले. गाईची होणारी तडफड पाहून नागरीकांनी याबाबतची माहिती ई-1 वॉर्ड आरोग्य निरीक्षक शशिकांत साठे यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येत असल्याने, याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली. साठे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गाईची तपासणी केली. यादरम्यान गाईच्या पोटामध्ये वासरू फिरल्याने तिची प्रसुती होण्यामध्ये अडचण निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची ंमाहिती पांजरपोळमधील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. बागल यांना दिली. दरम्यान, या गाईला होणाऱया असहय्य वेदना पाहून साठे यांनी स्वतः गाईची प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुमारे अर्ध्यातासाने गाईची प्रसुती नैसर्गिकरित्या करण्यात त्यांना यश आले. प्रसुती यशस्वीरित्या केल्याने येथे जमलेल्या नागरीकांनी साठे यांचे अभिनंदन केले. 

   चौकट

गाईच्या पोटात प्लॅस्टीक पिशव्या

प्रसुती झाल्यानंतरही या गाईचे पोट मोठ दिसत असल्याने साठे यांना आणखीन एक वासरू असेल अशी शंका आली. त्यांनी तपासले असता वासरू नसल्याचे निष्पन्न झाले, पण गाईच्या पोटात प्लॅस्टीकच्या पिशव्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.