|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेत पारदर्शकता

नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेत पारदर्शकता 

राष्ट्रपतींचा गणतंत्र दिन पूर्वसंध्येला संदेश

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

‘नोटाबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेची गती तात्पुरती काहीशी मंदावणार असली तरी, अर्थव्यवस्थेच्या पारदर्शकतेसाठी हा निर्णय महत्वाचा आहे, अशी भलावण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केली आहे. त्यांनी बुधवारी 68 व्या गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून संदेश दिला. त्यात त्यांनी इतरही अनेक मुद्दय़ांना स्पर्श केला.

आपल्या संदेशाचा प्रारंभ राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कार विजेत्या सैनिकांना अभिवादन करून केला. गेल्या वर्षी पाकिस्तानवर केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्यात सहभागी झालेल्या सैनिकांचेही त्यांनी कौतुक केले. या सैनिकांना त्यांच्या हस्ते शौर्य पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. दहशतवादाच्या राक्षसाला नष्ट करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी मागेपुढे न पाहणाऱया आपल्या शूर सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.

उपासमारीबद्दल चिंता

प्रगती साधूनही आज देशातील 20 टक्के नागरीक गरीबी आणि उपासमारीच्या संकटाचा सामना करीत आहेत, ही चिंतेची बाब आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा दर आजही सातत्यपूर्ण रितीने 10 टक्क्यांच्या रहात नाही. तसेच बहुविधतेने भरलेल्या आपल्या संस्कृतीसमोर आजही काही हितसंबंधी लोक आव्हान उभे करतात, हे योग्य नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.

भारतात आता लोकशाही सखोल रूजलेली आहे. तिचा विस्तारही झालेला आहे. तथापि, याच लोकशाहीअंतर्गत असणाऱया अनेक व्यवस्था त्रुटीपूर्ण आहेत. लोकशाही अधिक सशक्त होण्यासाठी सहिष्णुतातत्व, संयम आणि इतरांचा सन्मान राखण्याचा गुण यांचे आणखी संवर्धन झाले पाहिजे, अशीही सूचना त्यांनी केली.

निवडणूक सुधारणा आवश्यक

निवडणुकीत होणारा खर्च आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. पंतप्रधान मोदींनीही हाच विचार काही महिन्यांपूर्वी व्यक्त केला होता.

आज राजपथावर भव्य संचलन

गुरूवारी गणतंत्रदिनी येथील राजपथावर सेनेच्या तीन्ही दलांचे भव्य पथसंचलन होणार आहे. यात इतरही अनेक संस्था आणि सर्व राज्यांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबुधाबीचे युवराज उपस्थित राहणार आहेत.

Related posts: