|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचा हिरमोड

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचा हिरमोड 

सिंधुदुर्गनगरी : स्काऊट गाईट अभ्यासक्रमांतर्गत राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातील पाच विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनी हिरमुसले होत सिंधुदुर्गनगरीतून परतावे लागले. या  मुलांना पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार देण्यासाठी प्रजासत्ताकदिनी जिल्हा मुख्यालयातील मुख्य ध्वजारोहण सोहळय़ास उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले. मात्र ऐनवेळी आचारसंहितेचे कारण पुढे करून पुरस्कार न देताच त्यांना माघारी पाठवण्यात आले. शिक्षणासाठी चेन्नईत राहणारा एक विद्यार्थी तर पुरस्कार स्वीकारण्यासाठी खास जिल्हय़ात आला होता. या विद्यार्थांना आता पुरस्कार स्वीकारण्यासाठी महाराष्ट्र दिनी येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

स्काऊट गाईट अभ्यासक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावर लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा दिल्यानंतर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून राष्ट्रपती पुरस्कार दिला जातो. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व नोकर भरतीमध्ये त्याचा फायदा होतो. रेल्वे भरतीमध्येही दोन टक्के आरक्षण असते. या वर्षी जिल्हय़ातील पाच विद्यार्थ्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यामध्ये सावंतवाडीतील मिलाग्रीस हायस्कूलची विद्यार्थिनी पद्मजा आंबिये, अंकिता बांदेकर, कणकवली विद्यामंदीर हायस्कूलची विद्यार्थिनी श्रद्धा सावंत, आदिती मालपेकर, ओरोस डॉन बॉस्को स्कूलचा विद्यार्थी अल्ताफ शेख यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने जिल्हा स्काऊट गाईड कार्यालयाला कळवून प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी पोलीस परेड मैदानावर पुरस्कार वितरणाची रंगीत तालीमही घेतली. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रजासत्ताक दिनी सिंधुदुगनगरी येथे हे पाचही विद्यार्थी आले. डॉन बॉस्को स्कूलचा विद्यार्थी अल्ताफ शेख हा बारावीनंतर इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी चेन्नई येथे  राहतो. पुरस्कार स्वीकारण्यासाठी तो खास चेन्नई येथून आला होता.

विद्यार्थी आले खरे, परंतु आयत्यावेळी आचारसंहिता असल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देता येणार नाहीत. जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते जिल्हाधिकारी दालनात पुरस्कार दिले जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ध्वजारोहण सोहळा आटोपून हे विद्यार्थी पोलीस परेड मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. तेथे सुमारे अर्धा तास ताटकळत बसल्यानंतर आचारसंहितेचेच कारण सांगून राष्ट्रपती पुरस्कार आता देण्यात येणार नाहीत. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी पुरस्कार देण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाकइtन सांगण्यात आले. एकूणच या साऱया प्रकारात विद्यार्थ्यांचा चांगलाच हिरमोड झाला. आचारसंहितेमुळे हे पुरस्कार देता येणार नाहीत, हे प्रशासनाला अगोदर समजले नव्हते का? त्याबाबत अगोदर विचारविनिमय करून निर्णय घेता आला नसता का? की प्रशासकीय उदासीनता कारणीभूत ठरली? आदी सवाल त्यामुळे उपस्थित झाले आहेत.