|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » …तरीही काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांची रीघ

…तरीही काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांची रीघ 

अद्यापपर्यंत 1670 इच्छुक उमेदवार

काँग्रेसमधील गटबाजी, मतभेदांचा इच्छुकांवर परिणाम नाही

मुंबई / प्रतिनिधी

आगामी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता मुंबई शहर काँग्रेस कमिटीने इच्छुक उमेदवारांची रिघ लागली आहे. मंत्रालयासमोरील गांधी भवन, शहर अध्यक्षांचे कार्यालय असलेले राजीव गांधी भवन तसेच टिळक भवनातही इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अद्यापपर्यंत 1670 उमेदवार एकटय़ा मुंबई शहर आणि उपनगरांतून इच्छुक आहेत. तर प्रत्येक प्रभागात 5 ते 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात पर्याय म्हणून सज्ज असल्याचे काँग्रेस पक्षातील एका पदाधिकाऱयाने सांगितले.

निरुपम-कामत गटबाजी, मागच्या निवडणुकांचे निकाल आणि निवडणूक निकालांमधील एकूणच काँग्रेस पक्षाचा घसरता आलेख पाहिल्यास होणाऱया महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षात इच्छुकांचा ओघ कमी असेल असा अंदाज राजकीय विश्लेषक करत होते. मात्र, प्रत्यक्षात काँग्रेसमध्ये याउलट होताना दिसत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधा बहुतांश कार्यकर्ते काँग्रेस पक्षातून निवडणूक लढविण्यास सज्ज झाले होते. केंद्राचा नोटाबंदीचा निर्णय यास कारणीभूत असल्याचे सांगत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानणारे बहुतांश इच्छुक उमेदवार असल्याचे एका पदाधिकाऱयाने सांगितले. पालिका निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण असल्याने महिला उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यातून नेते, कार्यकर्ते आणि उमेदवारांचे समर्थक संजय निरुपम यांच्या कार्यालयात मोठय़ा प्रमाणात हजेरी लावून निष्ठा दाखवत आहेत.

याबाबत दक्षिण मध्य मुंबई जिल्हा युवा काँग्रेस अध्यक्ष अभिषेक सावंत यांनी सांगितले की, मुंबईतील 227 नगरसेवकांच्या जागांसाठी काँग्रेस पक्षातून 1670 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. याचा अर्थ प्रत्येकी एका वॉर्डमधून 5 ते 12 उमेदवार असल्याचे प्रमाण सांगते. कित्येकवेळा काँग्रेसवर ओबीसी महिला किंवा एससी महिला, अल्पसंख्याक उमेदवारच नसल्याचा आरोप लावला जातो. मात्र, या इच्छुकांच्या संख्येने काँग्रेस पक्षावरील विश्वास दाखविण्यात आला असल्याचे सावंत म्हणाले. उमेदवार निवडीसाठी निरुपम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा समिती उमेदवारांच्या मुलाखतीसाठी सज्ज आहेत. मुलाखतीनंतर ठरविण्यात आलेले उमेदवार निरीक्षक समितीकडे सोपविण्यात येणार आहेत.