|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » शिवसेनेला औकात दाखवून देणार

शिवसेनेला औकात दाखवून देणार 

प्रतिनिधी/ मुंबई

केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारात तुम्ही सांगाल तेवढी पारदर्शकता आणण्याची आपली तयारी आहे. मात्र, तुम्हाला महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता का मान्य नाही? असा खडा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शिवसेनेला केला. छत्रपती शिवाजी महाराजांना भाषणापुरती मर्यादित ठेवून खंडणी वसूल करणाऱयांना महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असेही फडणवीस यांनी बजावले. भाजपची औकात काढणाऱयांना 21 फेब्रुवारीला औकात दाखवून देऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

25 वर्ष युतीत सडलो असे आम्ही म्हणणार नाही. मात्र, 25 वर्षाच्या युतीत खरे नुकसान मुंबईचे झाले. राष्ट्रवादाच्या आधारावर युती झाली असताना त्यात तुमची 25 वर्ष सडली असतील. परंतु, छोटा पक्ष म्हणून ताकद असतानाही आम्ही तुम्हाला सत्ता दिली. आता या 25 वर्षात आम्हाला कुणासोबतही फरफटत जायचे नाही हा धडा दिला. फरफटत गेलात तर समाजाचे आणि मुंबईचे नुकसान आहे हे आम्ही शिकलो, अशा शब्दात फडणवीस यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताकदिनी गोरेगावच्या एनएसई मैदानातील मेळाव्यात भाजपवर जोरदार टीका करीत महापालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. शिवसेनेच्या या घोषणेनंतर अवघ्या 48 तासात भाजपने त्याच जागी विजय संकल्प मेळावा घेऊन शिवसेनेचे राजकीय आव्हान स्वीकारले. शिवसेनेचा उल्लेख कौरवसेना असे करीत भाजपने सेनेविरुद्धच्या लढाईला धर्मयुद्धाची उपमा दिली आणि या युद्धात सत्याची बाजू पाहून लढण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

 राज्य सरकारप्रमाणे महापालिकेतही एकत्र काम करावे या हेतूने आपण महापालिका निवडणुकीत जागेची शर्थ ठेवली नाही. महापालिकेचा पारदर्शीपणा आणि भ्रष्टाचार विरहित कारभार ही एकच शर्थ होती. आपली त्यांच्या विचाराशी नव्हे तर आचाराशी फारकत होती. आपल्याला त्यांच्या आचारात परिवर्तन हवे होते. मात्र, आता प्रामाणिकतेच्या मुद्यावर तडजोड होणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच जाहीर भाषणातून शिवसेनेवर हल्ला चढवला. खंडणीखोर, दुटप्पी आणि लोकांचा दिशाभूल करणारा पक्ष अशा शब्दात सेनेची संभावना करीत फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला. पारदर्शी कारभार हा शिवाजी महाजारांचा मूलमंत्र आहे. मला महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मुंबईत परिवर्तन होणारच, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेनेच्या हट्टामुळे विधानसभेत युती तुटली

 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या हट्टामुळेच युती तुटल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेने विश्वास व्यक्त केल्यानंतर विधानसभेत शिवसेनेला 147 जागा देण्याचे आम्ही मान्य केले होते. भाजप 127 आणि मित्र पक्षांना 18 जागा असे वाटप ठरले होते. परंतु, 151 पेक्षा एकही जागा कमी घेणार नाही, या बालहट्टामुळे युती तुटली, असे फडणवीस यांनी सांगितले. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने 65 जागा लढवल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ताकद दिसून आल्यानंतरही भाजपला 60 जागा देऊ केल्या. याचा अर्थ शिवसेनेला पारदर्शकतेचा अजेंडा मान्य नव्हता. युती करायची नाही हे शिवसेनेने आधीच ठरवले होते, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

…तर मुख्यमंत्री झालो नसतो

विधानसभा निवडणुकीत युती झाली असती तर मुख्यमंत्री झालो नसतो, अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. विधानसभेला युती तुटली म्हणून नियतीचे आभार मानले पाहिजेत. युती तुटली म्हणूनच राज्यात भाजपची ताकद लक्षात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.