|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पुण्यात ‘हे राम नथुराम’विरोधात निदर्शने

पुण्यात ‘हे राम नथुराम’विरोधात निदर्शने 

काँग्रेस, संभाजी ब्रिगेडचे आंदोलन : कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, नाटक बंद पाडण्याचाही प्रयत्न

पुणे / प्रतिनिधी

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याच्यावर आधारित ‘हे राम नथुराम’ या नाटकाविरोधात पुण्यात संभाजी ब्रिगेड आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शनिवारी तीव्र निदर्शने केली. अखेर कडक पोलीस बंदोबस्तात या नाटकाचा प्रयोग पार पडला.

 पुण्यातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभागृहात शनिवारी दुपारी एकच्या सुमारास ‘हे राम नथुराम’ नाटक सुरू होणार होते. ते नाटक सुरू होण्याअगोदरच पुणे शहर काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नाटय़गृहाबाहेर धरणे धरायला सुरुवात केली. त्याचबरोबर सरळ नाटय़गृहात प्रवेश करीत नाटक बंद पाडण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी तुरळक लाठीमार करीत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, नगरसेविका संगीता तिवारी, पुणे काँग्रेसचे उपाध्यक्ष अजित दरेकर, संभाजी ब्रिगेडचे पुण्याचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे तसेच अन्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.

पोलीस बंदोबस्तात नाटकाला सुरुवात

आंदोलनकर्त्यांनी पोलिसांकडे नाटक रद्द करण्यासाठी तसेच आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु, पोलीस प्रशासनाने त्यांना परवानगी दिली नाही. नाटकाला विरोध करणाऱयांना रोखण्यासाठी पोलिसांनी नाटय़गृहाबाहेर मोठा बंदोबस्त लावला होता. आंदोलनकर्त्यांना न जुमानता एक वाजता नाटकाला सुरुवात झाली. पुण्याबरोबरच राज्यात अन्य ठिकाणीही या नाटकाला विरोध होत आहे. तसेच नाटकात नथुरामचे उदात्तीकरण करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
गांधींवर आधीही नथुरामचे हल्ले

महात्मा गांधी अस्पृश्यता निवारण्याचे काम करत होते. त्याला विरोध करण्यासाठी नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केली. पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याच्या अगोदरही गोडसेने गांधीजींवर हल्ला केला होता, असे ‘एक धैर्यशील योद्धा गांधी’ या पुस्तकाचे लेखक संकेत मुनोत यांनी सांगितले.
 सेन्सॉरच्या मताशी सहमत : शाम देशपांडे
 सेन्सॉर बोर्डाने एकदा या नाटकाला मान्यता दिली म्हणजे नाटकाला विरोध करण्याची गरज नाही. जातीव्यवस्थेमध्ये तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेससारख्या पक्षाने सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिलेल्या नाटकाला विरोध करणे, हे लोकशाहीत बसत नाही. शिवसेना जातीयवाद मानत नाही. सेन्सॉर बोर्डाने दिलेल्या मताशी आम्ही सहमत आहे, अशी भावना सेनेचे पुणे शहर संघटक शाम देशपांडे यांनी व्यक्त केली.
 शरद पोंक्षे सांस्कृतिक दहशतवादी : संतोष शिंदे
‘हे राम नथुराम’ नाटकाद्वारे शरद पोंक्षे समाजाला खोटा गांधी सांगत आहेत. सामाजिक वातावरणात तेढ निर्माण करण्याचे काम या नाटकाद्वारे होत आहे. शरद पोंक्षे हे सांस्कृतिक दहशतवादी आहेत. त्यांचे हे नाटक तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी मांडली.

Related posts: