|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाईत बॉयलरचा भीषण स्फोट

वाईत बॉयलरचा भीषण स्फोट 

प्रतिनिधी/ वाई

वाईतील फुलेनगर (चौडा फाटा) येथे हळद शिजवित असताना बॉयलरचा जोरदार स्फोट होऊन चौघे जखमी झाले. हा स्फोट शनिवार 28 रोजी आनंदा अडसूळ यांच्या शेतात झाला. जखमींमध्ये अडसूळ यांचा पंधरा वर्षाचा मुलगा निखील अडसूळ, मंजुनाथ साक्षी (वय 30), सिद्धाप्पा वग्गे (वय 30), राचय्या स्वामी (वय 40) या तीन कामगारांचा समावेश आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याला सातारच्या खासगी रुग्णालयात तर इतर तिघांना वाईच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

घटनास्थळावरून व वाई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, शनिवारी सकाळी दहा वाजता आनंदा (दादा) अडसूळ यांची हळद चंद्रकांत शिर्के यांच्या हळदीच्या बॉयलरच्या सहाय्याने शिजविण्याचे काम चालू होते. कामगारांकडून बॉयलरचा गॅस सोडण्याचे राहून गेल्याने गरम वाफ एकत्र येऊन तिचे प्रेशर वाढून बॉयलरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा प्रचंड होता की बॉयलर स्टीम उडून जवळ पास एक हजार मीटरवर जाऊन पडला. मध्ये झाड आडवे आल्याने मोठा अनर्थ टळला. ज्या शेतात तो स्टीमरजावून पडला त्या ठिकाणी पाच फुटाचा खड्डा पडला असून त्याचे सर्व पार्ट वेगवेगळे झाले आहेत. तसेच शेजारील शेतात आठ ते दहा कामगार हळद काढण्याचे काम करीत होते. सुदैवाने बॉयलर वरील कामगार सोडून कोणालाही इजा झाली नाही परंतु ते सर्व कामगार प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते. प्रचंड आवाजाचे संपूर्ण परिसर हादरून गेला. जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यासाठी वाईतील 108 नंबर अम्ब्युलन्स उपलब्ध होऊ न शकल्याने भुईंज रुग्णालयाच्या अम्ब्युलन्सने जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर योग्य ते उपचार होऊ न शकल्याने त्यांना त्वरित वाईतील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. एकाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला सातारा येथे नेण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस करीत आहेत.

 

Related posts: