|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » प्रसन्न रहा, भरपूर गुण कमवा !

प्रसन्न रहा, भरपूर गुण कमवा ! 

‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

‘सध्या परीक्षांचा काळ आहे. विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता त्यांना सामोरे जावे. या कालावधीत विद्यार्थी जितके प्रसन्न राहतील, हसतमुख असतील आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करतील, तितकी त्यांची परीक्षेतील कामगिरी उजळ होईल, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केली आहे. रविवारी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून आणि सूचना करून प्रतिसाद दिला.

परिक्षेचे दडपण घेतले तर केलेला अभ्यासही आठवत नाही, असा अनुभव येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये जास्तीत जास्त तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा. चित्त प्रसन्न असेल तर जो अभ्यास केला आहे तो उत्तर पत्रिकेत व्यवस्थित सादर करता येतो. त्यामुळे प्रसन्न राहण्याचे विविध मार्ग विद्यार्थ्यांनी अनुसरावेत. पालकांनीही त्यांना या संबंधात साहाय्य करावे. एखाद्या रूग्णाला आपण भेटावयस गेलो आणि तेथे त्याच्या आजाराच्या गंभीरपणाविषयी आपण बोलत नाही. उलट त्याला आपण लवकर बरे व्हाल, असा धीर देतो. तशाच प्रकारे परीक्षांच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना सारखे अभ्यासाबद्दल विचारून त्याचा तणाव वाढवू नये. उलट वातावरण हलके फुलके ठेवून ताण दूर करण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला त्यांनी पालकांनाही दिला.

कॉपीचा आधार घेऊ नका

कॉपी करून परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करणे हे केवळ कायदेशीर नाही, असे नव्हे, तर अनैतिकही आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करून गुण मिळविणे उचित आहे, असेही मोदींनी स्पष्ट केले. एका व्यक्तीने विद्यार्थी जीवनात केलेल्या कॉपीची कबुली आपल्या वक्तव्याद्वारे त्यांना दिली होती. त्या संदर्भात ते बोलत होते.

प्रतिस्पर्धेपेक्षा अनुस्पर्धा उत्तम

आपण नेहमी इतरांशी आपली तुलना करतो. इतरांना आपल्यापेक्षा जास्त गुण मिळाले की आपल्याला वाईट वाटते. तसेच जास्त मिळाले तर आनंद होतो. तथापि, अशी दुसऱयाशी स्पर्धा करण्यापेक्षा आणि स्वतःशीच स्पर्धा करावी. प्रत्येक परीक्षेत आधीच्या परीक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असावा. यातून मोठे समाधान मिळते. उलट दुसऱयांशी स्पर्धा केल्याने सतत आपल्याला दडपणाखाली रहावे लागते, असाही बहुमोल सल्ला मोदींनी दिला.

विद्यार्थी आणि परीक्षा…

ड परीक्षाचे दिवस सोहळय़ाप्रमाणे आनंदाचे होण्यासाठी प्रयत्न करा

ड उत्तरपत्रिका लिहिताना दडपणाखाली न येता मन प्रसन्न असू द्या

ड दडपणामुळे बुद्धीचे दार बंद होते, त्यातून काही बाहेर येत नाही

ड वर्षभर केलेला अभ्यास तणावामुळे ऐन परीक्षेत निरूपयोगी ठरतो

ड हे टाळायचे असेल तर मनाला प्रसन्नता मिळेल असे मार्ग शोधा

ड पालकांनीही परीक्षांच्या दिवसात घरचेवातावरण प्रसन्न राखावे