|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नमन-खेळ्य़ांद्वारे कोकणच्या शिमगोत्सवाची नांदी!

नमन-खेळ्य़ांद्वारे कोकणच्या शिमगोत्सवाची नांदी! 

रत्नागिरी

जगाच्या पाठीवर कोकणची खरी ओळख दर्शवणारा उत्सव म्हणजे शिमगोत्सव! कोकणचा शिमगा आता नजीक आला आहे आणि त्याची नांदी गावागावातून सुरू झाली आहे. शिमगोत्सव म्हणजे कोकणच्या अस्सल लोककलांचे सादरीकरण! नमन-खेळे आणि त्यातून सादर केली जाणारी विविध धार्मिक, पौराणिक मुखवटय़ांची रूपे हे या शिमगोत्सवाचे एक वेगळेपण. अस्सल पारंपरिक लोककला म्हणून ओळखल्या जाणाऱया या नमन-खेळय़ांना आता रत्नागिरीतल्या खेडोपाडी सुरुवात झालीय. मिरजोळे गावातही नुकतीच ‘भूताचे खेळे’ नाचवून नमन-खेळ्य़ांच्या शुभारंभाची ढोलकीवर थाप पडली आहे.

शहरानजीकच्या मिरजोळे गावातही ही परंपरा जुनेजाणते लोक पिढी दरपिढी जपत आले आहेत. प्रतिवर्षीप्रमाणे शिमगोत्सवाआधीच्या या परंपरेला नुकताच शुभारंभ झाला. गणपती, नटवा, रावण, वाघ आदी मुखवटे पेटाऱयातून काढून ते नाचवण्यात आले. नमन खेळ्य़ांचा शुभारंभ करण्यापूर्वी नाचवण्यात येणाऱया या प्रथा परंपरेला ‘भूताचे खेळे’ म्हणून संबोधले जाते. मिरजोळे गावचे हे वैशिष्टय़च म्हणता येईल.

नमन खेळ्य़ांना सुरुवात करण्यापूर्वी ग्रामदेवतेचा कौल (प्रसाद) घेऊनच ढोलकीवर थाप मारण्याची प्रथा आहे. ढोलकीवर थाप पडली की, मग रंगदेवतेला वंदन करून, पारंपरिक मौखिक गाण्यांवर नमनातली मुखवटाधारी सोंगे नाचवली जातात. रत्नागिरी शहारानजीकच्या मिरजोळे गावात या प्रकाराला भूताचे खेळे म्हणून येथील ग्रामस्थ पिढय़ान्पिढय़ा चालत आलेली प्रथा जपत आहेत.

पारंपरिक कलेला आजही मोठे महत्व

कोकणात सर्वत्र नमन (खेळे) या पारंपरिक कलेला आजही मोठे महत्व आहे. पिढय़ान्पिढय़ा चालत आलेल्या या कलेचे महत्व कमी न होता दिवसेंदिवस वाढत आहे. या कलेला पारंपरिकतेचा बाज आहे. धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक कथा या सादर केल्या जातात. एका अर्थी या नमन खेळ्य़ांद्वारे ग्रामीण भागातील जनतेमध्ये जनजागृती करण्याचेही कार्य केले जाते. यामध्ये ग्रामीण भागातील ग्रामस्थांची ग्रामदेवतेप्रती श्रद्धा व या पारंपरिक कलेवर विशेष प्रेम दिसून येते. परंपरा, गावकार, मानकरी, देवदेतांप्रती श्रद्धा यांची गुंफण शिमगोत्सवातील या परंपरांतून दिसून येते.

शिमग्याच्या सणापूर्वी नमन मंडळे नमन खेळ्य़ांसाठी तयारीला लागतात. मिरजोळे गावातील ग्रामस्थही त्या तयारीला लागतात. त्यासाठी ग्रामस्थांची बैठक बोलावण्यात येते. गावप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली चर्चा होते. गावातील सार्वजनिक कार्यक्रम सुरु करण्यापूर्वी ग्रामदेवतेच्या नावाने कौल घेतला जातो. त्यावेळी ग्रामदेवतेला साकडे घातले जाते. ढोलकीवर थाप मारल्याशिवाय गावात सार्वजनिक नमनाला रंग चढत नाही, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.

 ढोलकीवर थाप मारून ’भूताचे खेळे’ रंगतात. त्यात सारे ग्रामस्थ अगदी उत्साहीपणे समरस होऊन फेर धरतात. ग्रामदेवतेला व सर्व देवतांना पारंपरिक सुरांच्या तालावर नमन गीते सादर केली जातात. त्यावेळी आधी गणपती नाचतो मग नटवा आणि नंतर मग रणवीर, वाघ, रावण अशी सोंगे नाचवली जातात. अशा प्रकारे शिमगोत्सवाची ही नांदी मिरजोळे गावातील ग्रामस्थांनी उत्साहात केली आहे.

मिरजोळेवासीय जपताहेत आत्मियतेने लोककला  

काळ बदलला तरी ग्रामदेवतेच्या नावाने सुरु झालेल्या या कोकणी लोककलेचा वारसा कोकणातील गावागावात तितक्याच आत्मियतेने जपला जात आहे. याच श्रद्धेने मिरजोळेवासीय ही लोककला आत्मियतेने जपत आहेत. यामध्ये गायली जाणारी गीते कुठेही लिखित स्वरूपात नसतात तर ती जुन्या जाणत्यांकडून पिढी दरपिढी मौखिक स्वरूपात पुढे हस्तांतरित होतात.

परंपरा युवावर्गाकडे होतेय हस्तांतरित

विशेष म्हणजे या आधुनिक काळातही कोकणातील युवावर्गही ही परंपरा जपण्यात रस घेत आहे. कुठेही नोकरीला असला तरी तिथून ही परंपरा जपण्यासाठी युवावर्ग गावात येतात. रात्री कितीही वाजताही परंपरा सुरू होत असली तरी प्रथेप्रमाणे ती परंपरा पाळली जाते. तसेच जुनेजाणते त्यांच्याकडील गीते आता युवापिढीकडे हस्तांतरित करत आहेत. त्यामुळे निश्चितच कोकणची ही लोककला पुढेही जपली जाईल, याची खात्री वाटते.

Related posts: