|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट : मनमोहन सिंग

अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट : मनमोहन सिंग 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

काँग्रेसने अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारवर हल्ला चढवत आर्थिक मोर्चावर सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप केला. काँग्रेसने आर्थिक दस्तऐवज जारी करत आर्थिक मोर्चावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर काँग्रेसने विजय मल्ल्या यांच्यासोबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पत्रव्यवहाराच्या भाजपच्या आरोपांवर उत्तर देखील दिले.

वर्तमान काळात भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत नाही. रालोआ सरकार आर्थिक मोर्चांवर अपयशी ठरल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटले. आमच्याद्वारे जे दस्तऐवज सादर केले जात आहे. त्यात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर चर्चा करण्यात आली आहे. हा अहवाल पूर्ण संशोधन आणि आर्थिक आकडेवारीसह सरकार लोकांची दिशाभूल करत असल्याचे सिद्ध करतो असा दावा चिदंबरम यांनी केला.

मल्ल्या यांच्या पत्राबाबत बोलताना मनमोहन सिंग यांनी ती सर्व पत्रे सामान्य होती आणि यात काहीही चुकीचे किंवा बेकायदेशीर कृत्य करण्यात आलेले नाही असे स्पष्टीकरण दिले. अनेक उद्योजक पंतप्रधान कार्यालय आणि मंत्रालयांना पत्र लिहित असतात, जी पुढे संबंधित अधिकाऱयांना पाठविली जातात असा दावा त्यांनी केला.

ज्याप्रकारे सरकार आपल्या आर्थिक यशाचे दावे करत आहेत, ते पाहता सरकारने नव्या रोजगाराच्या संधी कोठे आहेत हे सांगावे. नवी गुंतवणूक का आली नाही? व्यवसायाच्या शक्यता कशा वाढतील हे स्पष्ट करावे. संपुआ सरकारने आपल्या कार्यकाळात 7.5 टक्के सरासरी विकास दर राखला होता आणि जवळपास 4 कोटी लोकांना दारिद्य्ररेषेबाहेर काढले होते. तर वर्तमान सरकारने जीडीपीचे आधारभूत वर्ष आणि आकडेवारीत फेरफार करून जीडीपी वाढवून दाखविण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला.