|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रस्ता 120 फुटाचा अन् उड्डाणपुलाची रुंदी 40 फूट

रस्ता 120 फुटाचा अन् उड्डाणपुलाची रुंदी 40 फूट 

प्रतिनिधी/ बेळगाव

रेल्वे खाते आणि राज्य शासनाच्यावतीने धारवाड रोड येथील फाटकावर उड्डाणपूल उभारणीसाठी खोदाईचे काम सोमवारपासून सुरू झाले आहे. मात्र रस्त्याची रुंदी 120 फूट असताना फक्त 40 फूट रुंदीचा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. यामुळे तो अरुंद होण्याची शक्मयता आहे. उड्डाणपुलाची रूंदी कमी करण्यामागे राजकीय व्यक्तींचा हात असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

 धारवाड  रोड येथील उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ दि. 24 रोजी करून सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. तसेच मार्किंग करून पिलरसाठी खोदाईचे काम सोमवार दि. 30 पासून हाती घेण्यात आले. फाटकाशेजारी दोन्ही बाजूने पिलर उभारण्यात येणार आहेत. उड्डाणपूल चाळीस फुटाचा करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे खात्याच्या अधिकाऱयांनी दिली असून रस्ता 120 फुटाचा रस्ता आणि उड्डाणपूल मात्र 40 फुटाचा असा अंदाधुंद कारभार असल्याचे निदर्शनास आले आहे.

या मार्गाने अवजड वाहनांसह दक्षिण भागातील वाहने आणि राष्ट्रीय महामार्गाला जाणाऱया वाहनांची गर्दी मोठय़ा प्रमाणात असते. यामुळे हा रस्ता 120 फुटाचा करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याचा आहे. सदर रस्ता सीडीपीप्रमाणे 120 फुटाचा असल्याने भविष्यात रस्त्याचे रुंदीकरण 120 फूट होण्याची शक्मयता आहे. पण येथील फाटकावरील उड्डाणपूल 40 फुटाचा करण्यात येत असल्याने तो अरूंद होण्याची शक्मयता आहे. परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होवून जैसे थे परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

खानापूर रोडचे रुंदीकरण 120 फूट करण्यात आले आहे. मात्र या रस्त्यावरील उड्डाणपूलदेखील चारपदरी करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी निर्माण होवू नये याकरिता रेल्वे खाते आणि राज्य शासनाच्यावतीने उड्डाणपूल उभारण्यासाठी कोटय़वधी निधीची तरतूद केली आहे. मात्र अरूंद पुलाची उभारणी करून समस्येचे निवारण होणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. रस्त्याचे रुंदीकरण 120 फूट करण्यासाठी अट्टहास करणारे लोकप्रतिनिधी धारवाड रोड व खानापूर रोड येथील उड्डाणपुलाची रूंदी वाढविण्यासाठी का प्रयत्न करीत नाहीत असा प्रश्न नागरिकांमधून करण्यात येत आहे.

 बडय़ा धेंडय़ांना वेगळा न्याय का ?

धारवाड रोड येथील उड्डाणपुलाची रूंदी कमी करण्यामागे राजकीय व्यक्तींचा हात असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. याठिकाणी असलेल्या बडय़ा आसामांच्या जागांवर संक्रात येवू नये याकरिता चक्क उड्डाणपुलाची रूंदीच कमी करण्याचा घाट घालण्यात आला आहे. सर्वसामान्यांना एक न्याय व बडय़ा धेंडय़ांना वेगळा न्याय राज्य शासन देत असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. यामुळे रस्त्याच्या रुंदीप्रमाणेच पुलाची रूंदी ठेवण्याची मागणी होत आहे.