|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » विलंब

विलंब 

प्लायवुड बनवणाऱया एका कंपनीची मजेदार जाहिरात आठवते. ‘सालोसाल’ असे काहीसे तिचे शीर्षक होते. एका तरुणाविरुद्ध तरुणीने दाखल केलेला खटला वर्षानुवर्षे चालत राहतो. निकाल लागत नाही. आरोपी आणि फिर्यादी जख्ख म्हातारे होतात. मात्र न्यायाधीश ज्या टेबलवर हातोडा आपटून ‘ऑर्डर, ऑर्डर,’ असे ओरडतात, त्या टेबलवरचे प्लायवुड तसेच टिकून राहते-अशा आशयाची ती जाहिरात होती. कोर्टातला  विलंब आपल्या पूर्वजांनाही ठाऊक असल्यानेच मराठीत ‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ हे सुभाषित जन्मले असावे.

आपले एक दिवंगत पंतप्रधान नरसिंहराव विद्वान होते, भाषाप्रभू होते. मात्र त्यांच्यावर होणारी एक टीका म्हणजे कोणत्याही समस्येवर ते त्वरेने निर्णय घेत नसत. त्यामागे त्यांची काही भूमिका असेल. पण त्यावरून वाचलेला एक विनोद आठवतो. त्यावेळी मोबाईल आणि इंटरनेटचा प्रसार झाला नव्हता. शाळेला सुट्टी लागल्यावर माहेरी जायचे म्हणून एका मुलाची आई भावाला पत्र लिहिते आणि ते पोस्टात टाकण्यासाठी आपल्या मुलाजवळ देते. नंतर सुट्टी लागल्यावर आई आणि मुलं माहेरी जातात. तेव्हा माहेरची माणसं चकित होतात. त्यांना पत्र मिळालेलं नसतं. आई मुलाला विचारते, “पत्र पोस्टात टाकलं होतंस नं व्यवस्थित?’’ तेव्हा मुलगा खिशातून पत्र काढतो आणि बाणेदारपणे उत्तर देतो, “एवढी घाई असेल तर तूच टाक की पोस्टात.’’   

आता रेडीमेड कपडय़ांचा जमाना आला आहे. पण पूर्वी कपडे शिवायला टाकले की ते वेळेवर कधी मिळत नसत. त्यावरून घडलेला विनोद-एका विसराळू प्राध्यापकांनी लग्न ठरल्यावर कपडे शिवायला टाकले आणि नंतर त्यांची पावती हरवली. त्यामुळे दुसरीकडून रेडीमेड कपडे घेऊन ते बोहल्यावर उभे राहिले. पुढे काही वर्षांनी त्यांना ती पावती सापडली. ती घेऊन टेलरकडे गेल्यावर टेलर शांतपणे म्हणाला, “कपडे तयार आहेत, फक्त काजे-बटन आणि इस्त्री राहिलीय. उद्या संध्याकाळी या, तयार ठेवतो.’’

हे किस्से आठवण्याचे कारण अशीच एक सत्यघटना ‘सॅन फ्रान्सिस्को क्रोनिकल’मध्ये आली आहे. 1917 साली एका महिलेने तेथील वाचनालयातून ‘फोर्टी मिनिट्स लेट’ नावाचे पुस्तक वाचायला नेले आणि परत करायला विसरली. काही दिवसांपूर्वी त्या महिलेचा पणतू जॉन्सनला ते पुस्तक घरात सापडले व त्याने ते वाचनालयात परत केले. शंभर वर्षांनी पुस्तक परत करणे हा तर विलंबाचा विक्रमच झाला.