|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प्रबोधन रॅलीच्या माध्यमातून गांधीजींना अभिवादन

प्रबोधन रॅलीच्या माध्यमातून गांधीजींना अभिवादन 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

महात्मा गांधीजींच्या विश्वबंधूत्व व सामाजिक शांतता या मूल्यांचे जागरण करण्यासाठी व त्यांच्या हत्येचे समर्थन करणाऱयांच्या निषेधार्थ शैक्षणिक व्यासपीठ व ऑल इंडिया स्टुडंट्स, यूथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक एकता व धर्मनिरपेक्षता प्रबोधन रॅलीला सुरूवात करण्यात आली. रॅलीच्या सुरूवातीला गांधी मैदानातील महात्मा गांधीजी यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महापौर हसीना फरास यांनी लोकशाही, धर्मनिरपेक्षता जपण्याची प्रतिज्ञा दिली. गांधी मैदान येथे सुरू झालेल्या रॅलीची सांगता बिंदू चौकात करण्यात आली. ‘बापू हम शरमिंदा है, तुम्हारे कातील जिंदा है’ अशा घोषणांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले.

प्रबोधन रॅलीमध्ये इंदुमती गर्ल्स हायस्कूल, महराष्ट्र हायस्कूल, ज्युनिअर गर्ल्स हायस्कूल, तात्यासाहेब तेंडूलकर ज्युनिअर कॉलेज, न्यू कॉलेज, कोल्हापूर हायस्कूल,  अशा विविध शाळांमधील 1 हजार 500 विद्यार्थी व शैक्षणिक, सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. प्रबोधन रॅलीच्या माध्यमातून सांस्कृतिक कला, शिक्षण इत्यादी क्षेत्रांच्या माध्यमातून महापुरूषांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी भविष्यकाळात कोणते उपक्रम घेतले जाणार याची माहिती देण्यात आली. 

शैक्षणिक व्यासपीठाचे एस. डी. लाड म्हणाले, गांधीजींच्या विचारांची पातळी इतर कोणाला गाठता येणार नाही. कोणी काही केले तरी गांधीजींचे विचार कधीच मरणार नाहीत. ऑल इंडिया युथ फेडरेशनचे राष्ट्रीय नेते गिरीश फोंडे म्हणाले, सध्या जातीयवादी संघटना नथुरामला देशभक्त व गांधीजींना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. नथुरामी विचारांचे षडयंत्र कोल्हापुरातील पुरोगामी संघटना हाणून पाडतील. तसेच इतिहासाचे विकृतीकरण आणि भारतीय राज्यघटनेविरोधी वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, तो पुरोगामी संघटना कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत, असा इशाराही फोंडे यांनी दिला.

यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील,  भरत रसाळे, एस. जी. तोडकर, आर. डी. पाटील, आर. वाय. पाटील, सुधाकर सावंत, अनिल चव्हाण, एस. आर. मुळे, व्ही. यु. नागरगोजे, आशा खवाटे, मधुरा थरवल, मनिषा कवाळे, दिलदार मुजावर, बाबा ढेरे, मुकुंद कदम, नामदेव गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related posts: