|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सकल मराठा समाजाच्यावतीने आज शाहू महाराज पुतळयासमोर धरणे

सकल मराठा समाजाच्यावतीने आज शाहू महाराज पुतळयासमोर धरणे 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी उद्या ता. 31 रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. तत्पूर्वी, या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी काढण्यात आलेले मोर्चे हे मूक मोर्चे होते. त्यामुळे समाजबांधवांना कोणताही त्रास होवू नये, यासाठी रास्ता रोकोला फाटा देत धरणे आंदोलन करण्याच्या निर्णयावर एकमत झाले.

शाहू स्मारक भवन येथे सोमवारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, सुरेश जरग, बाबा महाडिक, फत्तेसिंह सावंत, अजित राऊत, दिलीप देसाई यांची उपस्थिती होती. यावेळी अजित राऊत म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी यापूर्वी काढण्यात आलेले मोर्चे हे मूक मोर्चे होते. चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे काहीजणांकडून समजले. 31 जानेवारीच्या रास्ता रोकोसाठी 39 ठिकाणे निश्चित करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हा निर्णय कोणी घेतला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

काहीजणांनी निवासी उपजिल्हाधिकाऱयांना भेटून 31 जानेवारीरोजी रास्ता रोको करण्याबाबत निवेदन दिले आहे. सकल मराठा समाज संघटनेच्या नेतृत्वाखाली कोणतेही निर्णय घेतले जावेत. परस्पर निर्णय कोणीही घेवू नयेत, असे आवाहन बाबा पार्टे यांनी केले. फत्तेसिंह सावंत म्हणाले, एखादा व्यक्ती म्हणजे सकल मराठा समाज नव्हे. मराठा मोर्चावेळी कोअर कमिटी स्थापन झाली होती. ज्यांनी रास्ता रोकोबाबत जिल्हाधिकाऱयांना किंवा जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिली होती. त्यांनी सकल मराठा समाजाचे बॅनर्स वापरली होती. त्यावर आक्षेप घेणे गरजेचे होते. नियोजन करणाऱया प्रमुख व ज्ये÷ कार्यकर्त्यांना याची पूर्वकल्पना द्यायला हवी होती.

दरम्यान, मुंबईत झालेल्या बैठकीत 31 तारखेला मोर्चा काढण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्हा परिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू असल्याने कार्यकर्त्यांना मुंबईत या दिवशी येता येणार नाही. तसेच आचारसंहिता असल्याने मुख्यमंत्री किंवा अन्य कोणीही लोकप्रतिनिधींना निवेदन देता येणार नाही. त्यामुळे अहिंसक मार्गाने चक्का जाम करण्याचा निर्णय मुंबईतील बैठकीत घेतला होता, असे यावेळी मुंबईतील बैठकीला उपस्थित असणाऱया कार्यकर्त्यांनी सांगितले.

सचिन तोडकर यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार आहे. त्यानुसार स्वाभिमान संघटनेच्यावतीनेही रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला होता. यावर अजित राऊत यांनी चक्का जाम करण्याऐवजी धरणे आंदोलन करण्याविषयी सुचवले.

बाबा इंदूलकर म्हणाले, मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थितीच्या आधारावर आरक्षण मिळणार आहे. मात्र, चक्का जाम करून जनजीवन विस्कळीत होईल आणि त्याचा आपल्याच बांधवांना त्रास होईल, असे कृत्य करू नये. मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी सुमारे सहा महिन्यांपूर्वी शासकीय कमिटी स्थापन झाली आहे. या सहा महिन्यात या कमिटीने आपला अहवाल सादर करायला हवा होता. याबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे. मराठा आरक्षणासाठी काढण्यात येणाऱया चक्का जाम बाबत सोशल मिडियावरून माहिती देण्यात येत आहे. मात्र, याबाबत दिशाभूल करणाऱया माहितीपासून कार्यकर्त्यांनी जागरूक रहावे, असे आवाहन ऍड. विवेक राणे यांनी केले.

बैठकीत चर्चेअंती कोल्हापूर शहरात चक्का जाम आंदोलन न करता उद्या 31 रोजी दसरा चौकातील शाहू महाराज यांच्या पुतळयासमोर मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याच्या निषेधार्थ सकाळी अकरा ते दीड यावेळेत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला राजीव लिंग्रस, दिलीप पाटील, कमलाकर जगदाळे, महेश जाधव आदी उपस्थित होते.

Related posts: