|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » न्यू ग्रॅन्ड हॉटेलची अखेर एक्झीट

न्यू ग्रॅन्ड हॉटेलची अखेर एक्झीट 

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगावकरांच्या पसंतीला उतरलेल्या न्यू ग्रॅन्ड हॉटेलने मंगळवारी एक्झीट घेतली आहे. या हॉटेलच्या जागेचा वाद न्यायालयात होता. जागेचा मालक असलेल्या  संस्थेने न्यायालयात दावा दाखल केला होता. तो दावा त्यांच्या बाजूने लागला. न्यायालयाने न्यू ग्रॅन्ड हॉटेल मालकाला जागा खाली करण्याचा आदेश चार वर्षांपूर्वीच दिला होता. मात्र जागा खाली करण्यास वेळकाढूपणा केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर महिला विद्यालय मंडळाने मंगळवारी ती जागा आपल्या ताब्यात घेतली आहे.

कॉलेज रोडवरील महिला विद्यालय मंडळाची ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून लीजवर न्यू ग्रॅन्ड हॉटेलच्या मालकांनी घेतली होती. लीज संपून 15 वर्षे उलटल्यानंतर ती जागा खाली करावी, असे महिला विद्यालय मंडळाने हॉटेल मालकाला सांगितले होते. तरीदेखील टाळाटाळ करण्यात येत होती. यामुळे संस्थेने हॉटेल मालक नितीन भंडारी यांच्या विरोधात तिसरे अतिरिक्त दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. तेथे महिला विद्यालय मंडळाच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर न्यायालयाने जागा खाली करण्याचा आदेश दिला होता. पण काही वेळ मागण्यात आला होता.

त्यानंतर पुन्हा दुसरे अतिरिक्त दिवाणी न्यायालय सिनिअर डिव्हीजन याकडे नितीन भंडारी यांनी आव्हान दिले होते. तेथेही महिला विद्यालयाच्या बाजूनेच निकाल लागला. त्यानंतर 27 जुलै 2011 रोजी जागा खाली करण्याचा आदेश न्यायालयाने बजावला. त्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. तरी देखील हॉटेल मालकाने जागा खाली केली नाही. यामुळे मंगळवारी न्यायालयाच्या कर्मचाऱयांच्या उपस्थितीतच ही जागा महिला विद्यालय संस्थेने ताब्यात घेतली आहे.

2009 सालीच जागेची लीज संपली

महिला विद्यालय संस्थेच्यावतीने ऍड. विवेक कुलकर्णी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. 2009 सालीच या जागेची लीज संपली होती, असे त्यांनी सांगितले. आम्ही त्यांना जागा खाली करण्यासाठी अनेक वेळा सांगितले. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे अखेर आम्हाला न्यायालयाच्या आदेशानुसार  कर्मचाऱयांच्या उपस्थितीतच ही जागा ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले.

न्यू ग्रॅन्ड हॉटेलमध्ये अनेक कलाकारांची हजेरी

न्यू ग्रॅन्ड हॉटेलची स्थापना 1948 साली झाली. या हॉटेलमधील अनेक पदार्थांची चव चाखण्यासाठी शहरच नव्हे तर परिसरातून खवय्ये येत होते. या हॉटेलमधील विविध पदार्थांची चव न्यारीच होती. त्यामुळे मुद्दामहून नाष्टा करण्यासाठी या हॉटेलमध्ये गर्दी होत होती. पुरीभाजी, टोमॅटो डोसा व इतर पदार्थांवर खवय्यांचा भर होता. विशेष म्हणजे येथील उप्पीट अनेकांच्या पसंतीस उतरले होते. सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकला जाणाऱया नागरिकांसाठी हे हॉटेल म्हणजे एक विश्रांतीगृह आणि नाष्टय़ाचे ठिकाण बनले होते. या हॉटेलमध्ये नामांकित कलाकार, राजकीय नेत्यांनी येऊन पदार्थांची चव चाखली आहे. अजूनही या हॉटेलची पेझ तशीच टिकून होती. मात्र जागेच्या वादातून आता हे हॉटेल खाली करावे लागले आहे. यामुळे हॉटेल ग्रीननंतर आणखी एका प्रसिद्ध आणि जुन्या हॉटेलला बेळगावकरांना मुकावे लागले आहे.

गेल्या दहा वर्षांपासून दिले नव्हते भाडे

न्यायालयात महिला विद्यालय मंडळाची बाजू भक्कम होती. या मंडळाची जागा ही लीजवर न्यू ग्रॅन्ड हॉटेल मालकांना दिली होती. 2009 साली लीज संपली. त्यानंतर जागा खाली करावी, असे मंडळाने सांगितले. पण मला काही अवधी द्या, अशी विनंती हॉटेलच्या मालकांनी केली. त्यावर माणुसकीच्या दृष्टिकोनातून वेळ देण्यात आला होता. मात्र त्यांनी अचानकपणे न्यायालयात दावा दाखल केला. यामुळे महिला विद्यालय मंडळालाही न्यायालयीन लढाई लढावी लागली. या मंडळाचे सेक्रेटरी आणि या खटल्याचे वकील विवेक कुलकर्णी यांनी न्यायालयामध्ये आपली बाजू भक्कमपणे मांडली. त्यामध्ये त्यांना यश आले. गेल्या 10 वर्षांपासून न्यू ग्रॅन्ड हॉटेल मालकांनी संस्थेला लीजवेळी ठरविलेले भाडेही दिले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शाळा व समाजासाठी जागेचा वापर करणार

न्यायालयाने मंडळाच्या बाजूने निकाल दिला आहे. रितसर ही जागा आम्ही कब्जात घेतली आहे. जवळपास अडीच ते तीन गुंठे ही जागा आहे. या जागेचा वापर शाळा किंवा समाजासाठी केला जाणार असल्याचे ऍड. कुलकर्णी यांनी सांगितले. न्यायालयाने यापूर्वीच आम्हाला जागा खाली करण्याचा आदेश मंजूर केला होता. मात्र हॉटेल मालकाच्या विनंतीवरून आम्ही त्यांना बरीच वर्षे जागा वापरण्यास दिली आहे. पण अधिक वेळ झाल्यामुळे आता ही जागा रितसर कब्जात घेतल्याचे त्यांनी सांगितले.

न्यू ग्रॅन्ड हॉटेल आता एखाद्या नव्या जागेत सुरू होणार का? याबद्दल बेळगावकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र ते स्पष्ट होऊ शकले नाही. संचालक नितीन भंडारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. मंगळवारी सकाळपासून हॉटेलमधील साहित्य कर्मचारीच बाहेर काढत होते. दरम्यान, त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही बोलणे टाळले. 

Related posts: