|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिवसेनेची दुसरी यादी आज

शिवसेनेची दुसरी यादी आज 

मालवण : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेने आपली पहिली यादी जाहीर करीत निवडणुकीत रंगत आणली आहे. त्यानंतर आता दुसरी यादी गुरुवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले. मालवण तालुक्यातील सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज 3 फेब्रुवारी रोजी शक्तीप्रदर्शनाने तहसील कार्यालयात भरण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी 10 वाजता शहरातील दैवज्ञ भवन येथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. सभेनंतर मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, असे तालुकाप्रमुख बबन शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती मतदारसंघामध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असून पहिल्या यादीत तालुक्यातील मसुरे आणि आचरा या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नव्हती. या ठिकाणी शिवसेनेकडून नवीन चेहरे उतरविण्यात येणार असल्याचे समजते. या उमेदवारांची घोषणा गुरुवारी होणार आहे. त्यानंतर शुक्रवारी शिवसेनेचे मालवण शहरात शक्तीप्रदर्शन होणार आहे. शिवसेनेच्या मतदार यादीकडे इतर राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपचीही चाचपणी

मालवण तालुक्याची भाजपची जबाबदारी संदेश पारकर यांच्यावर सोपविण्यात आल्याने पारकर बुधवारी दिवसभर मालवणात भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन उमेदवारी निश्चितीवर चर्चा करीत होते. शिवसेनेकडून स्वबळाची घोषणा करण्यात आल्यानंतर भाजपनेही आपल्याकडे उमेदवारांची संख्या अधिक असल्याने आम्हीही सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढू, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपने अधिकृतरित्या अद्याप उमेदवारी यादी जाहीर करण्याचा मुहुर्त स्पष्ट केलेला नसला, तरी शनिवारी भाजपकडून उमेदवार यादीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काँग्रेसचे आस्ते कदम, राष्ट्रवादी कुल कुल

मालवण तालुका पंचायत समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. बारा पैकी 11 पंचायत समिती सदस्य काँग्रेसचे आहेत. यातील प्रसाद मोरजकर यांनी शिवबंधन बांधले आहे. सहाही जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसची उमेदवार यादी सर्वप्रथम जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, इच्छुकांची संख्या वाढल्याने काँग्रेसने उमेदवार यादी जाहीर न करताच थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेससोबत आघाडी होते का? हे पाहिले जात असल्याने त्यांची भूमिका कुल कुल असल्याचे दिसते.