|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » …आता उस्ताद झाकीर हुसैन यांच्या बोटातील जादूची उत्कंठा!

…आता उस्ताद झाकीर हुसैन यांच्या बोटातील जादूची उत्कंठा! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

आर्ट सर्कल आयोजित दहावा ‘थिबा संगीत महोत्सव’ची नुकतीच स्वरमयी सांगता झाली. महोत्सवात जगविख्यात गायिका बेगम परविन सुलताना आणि विख्यात गायक पं. व्यंकटेश कुमार यांनी आपल्या गायिकीची मोहर उठवून महोत्सवाची दशकपूर्ती केली. आता तबलानवाज उस्ताद झाकीर हुसैन यांच्या तबल्यावर फिरणाऱया जादुई बोटांची जादू अनुभवण्यासाठी रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 9 फेब्रुवारी रोजी थिबा राजवाडय़ाच्याच मनमोहक पार्श्वभुमीवर सायंकाळी ही अनुभूती रसिक अनुभवणार आहेत.

संगीत महोत्सवाच्या दहाव्या वर्षानिमित्ताने खास मैफलींची आखणी यावर्षी करण्यात आली होती. यामध्ये महोत्सवाचा शुभारंभ डॉ. कद्री गोपालनाथ व पं. रोणू मुझुमदार यांच्या सॅक्सोफोन आणि बासरीच्या जुगलबंदीने झाला. त्यांनी राग चंद्रकंस, भूप छेडत महोत्सवात रंगत आणली. त्यांना तितकीच समर्थ साथसंगत तबल्यासाठी ओजस आडिया, तर मृदुंगासाठी प्रवीण व्ही यांनी केली. महोत्सवाच्या दुसऱया दिवशी विरजा व शामजीत किरण यांनी भरतनाटय़म्मधील छटा अतिशय सुंदररित्या साकारल्या. रोषणाईने उजळलेल्या थिबा राजवाडय़ाच्या पार्श्वभुमीवर या दोघांच्या मुद्रा, पदलालित्य अधिकच सुंदर, अन् उठावदार दिसून आले.

महोत्सव खऱया अर्थी ज्यांनी उजळवला त्या म्हणजे शास्त्राrय गायिका बेगम परवीन सुलताना आणि पं. व्यंकटेश कुमार यांच्या शास्त्राrय गायनातील परमोच्च सुरांनी! बेगम परवीन सुलताना यांनी राग मारू बिहाग रागाने आपल्या मैफलीला प्रारंभ केला. त्यानंतर राग वसंतमधील त्यांचे गुरू संगीतमार्तंड दिलशाद खाँसाहब यांच्या बंदिशी सादर केल्या. तसेच भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या आग्रहाखातर मराठीत गायलेले ‘रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते’ हे मिश्रतिलंग रागात राम पाठक यांनी संगीतबद्ध केलेले गीत त्यांनी सादर केले. तर मिश्रभैरवीत ‘भवानी’ या रचनेने त्यांनी राजवाडय़ाच्या परिसर सुरांनी भारून टाकला.

तर विख्यात गायक पं. व्यंकटेश कुमार यांनी दशक महोत्सवावर सुरेल कळस चढवत महोत्सवाची सांगता केली. पं. व्यंकटेश कुमार यांनी राग छायानटने मैफलीचा शुभारंभ केला. त्यानंतर सखी मोरी रूमझुमत, येरी धन धन भाग मोरी, काहे करत मोसे रार कन्हैय्या, सकी पुलनी अशा रागधारी रचना सादर करून महोत्सवात समा बांधला. खडय़ा आवाजासह ताना, मुरक्यांनी गायकीतील रंग त्यांनी रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचवले. रसिकांनीही याहून महोत्सवाची संस्मरणीय सांगता झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

महोत्सवाला यावर्षी भारतीय आयुर्विमा महामंडळचे मुख्य प्रायोजकत्त्व लाभले होते. तसेच महोत्सवांतर्गत पं. गणेश बेहरेबुवा यांच्यावरील मीरा म्युझिकतर्फे अजय गिडय़े यांनी निर्मित केलेल्या ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले. तर एसकुमार साऊंड सर्व्हिसचे उदयराज सावंत यांच्या उत्तम ध्वनिसंयोजनामुळे महोत्सवाला रंगत आली. महोत्सवादरम्यान दिप्ती कुवळेकर, पूर्वा पेठे यांनी सूत्रसंचलन केले.

वर्षागणिक महोत्सवाची उंची वाढतेय-जोगळेकर

महोत्सवात दिग्गज कलावंतांना ऐकण्याइतकीच कर्णमधुर हार्मोनियम साथ पं. अजय जोगळेकर यांनी केली. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात अनेक दिग्गज कलावंत या महोत्सवात येऊ शकतात आणि रत्नागिरीकरांना त्यांना ऐकण्याची संधी मिळू शकते. मात्र दळणवळणांच्या साधनांची कमी ही मुख्य समस्या असल्याचे सांगितले. विमानसेवा नसल्याने कलाकारांचे अमुल्य तीन दिवस अडकतात. तसेच हमरस्ता व रेल्वेसेवाही वेळखाऊ असल्याची मुख्य समस्या आहे. वर्षागणिक हा महोत्सव उंची गाठत आहे. भविष्यात या समस्या दूर होतील, अशी आशाही जोगळेकर यांनी यावेळी व्यक्त केली.