|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » परशुराम राणे यांना राष्ट्रपती पदक प्रदान

परशुराम राणे यांना राष्ट्रपती पदक प्रदान 

ओटवणेमहाराष्ट्र पोलीस सेवेतील 38 वर्षांतील उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याबद्दल विलवडे गावचे सुपुत्र तथा ठाणे शहर पोलीस उपनिरीक्षक परशुराम रामा राणे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राणे यांना हे पदक प्रदान करण्यात आले.

घरची परिस्थिती गरिबीची, त्यात अवघे दीड वर्षाचे असताना मातृछत्राला पोरके झालेल्या परशुराम राणेंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1978 मध्ये ते ठाणे पोलीस दलात शिपाई पदावर रुजू झाले. गेली 38 वर्षे त्यांनी राज्यातील विविध पोलीस ठाण्यात अनेक पदावर काम केले. सध्या ते ठाणे आयुक्तालय गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. पोलीस प्रशासनासह जनतेमध्येही मे. राणे मामा म्हणून परिचित आहे. आपल्या सेवेदरम्यान त्यांनी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोऱया, बलात्कार, अपहरण, घरफोडी, चिटींग, चेनस्नॅचिंग असे गुन्हे करणाऱया टोळक्यांचा त्यानी यशस्वी छडा लावला असून या उल्लेखनीय कार्याबद्दल त्याना आतापर्यंत 416 विशेष पारितोषिके व सन्मानपत्र त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

परशुराम राणे यांनी तपास केलेल्या चार केसेसमधील एकूण नऊ गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. ठाणे, मुंबई उपनगर नवी मुंबई या भागात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत त्यानी पोलीस प्रशासनात आपला वेगळा ठसा उमटविला. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी वर्गाने वेळोवेळी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. 2015 मध्ये ठाण्यात एका बँकेवर सशस्त्र दरोडा घालण्यासाठी गुन्हेगार टोळीचा त्यांनी प्रत्यक्ष सामना केला. त्यावेळी त्यांच्या मांडीस गोळी लागून गंभीर जखमी झाल्यानंतरही त्यांनी गुन्हेगारांना सळो की पळो करीत प्रतिकार केला.

राणे यांच्या पोलीस सेवेतील या सर्व कामगिरीची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने विलवडे परिसरातून राणे यांचे अभिनंदन होत आहे.