|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अपहार आढळल्यास एसटी वाहकांना मिळणार दणका

अपहार आढळल्यास एसटी वाहकांना मिळणार दणका 

कणकवलीरा. प. महामंडळातील वाहकांची अपहार प्रकरणे तडजोड करून निकाली काढण्यासंदर्भात यापूर्वी काढण्यात आलेले परिपत्रक रद्द करून नव्याने सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रवास भाडे वसूल करून तिकीट न दिल्याचे आढळल्यास या रकमेच्या 300 पट किंवा किमान 10 हजार रुपये एवढी रक्कम वसूल करायची आहे.

या नवीन सूचनांनुसार प्रवास भाडे वसूल करून तिकीट न दिल्यास प्रथम प्रमादाला अंतर्भूत रकमेच्या 300 पट किंवा 10 हजार रुपये यापेक्षा जास्त असेल, ती रक्कम, द्वितीय प्रमादाला अंतर्भूत रकमेच्या 400 पट किंवा 15 हजार यापैकी जास्त असेल एवढी रक्कम, तृतीय प्रमादाला अंतर्भूत रकमेच्या 500 पट किंवा 20 हजार यापैकी जास्त असेल ती रक्कम, तर चौथ्या प्रमादाला निलंबित करून शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. यात आरोप सिद्ध झाल्यास बडतर्फी हीच शिक्षा असणार आहे.

प्रवास भाडे वसूल न करणे व तिकीट न दिल्यास प्रथम प्रमादासाठी अंतर्भूत रकमेच्या 50 पट किंवा 1 हजार, द्वितीयसाठी अंतर्भूत रकमेच्या 100 पट किंवा 2 हजार, तृतीयसाठी अंतर्भूत रकमेच्या 150 पट किंवा 3 हजार यापैकी जास्त असेल, ती रक्कम वसूल करण्यात येणार आहे. तर चतुर्थ प्रमादासाठी निलंबित करून शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. यात आरोप सिद्ध झाल्यास बडतर्फी हीच शिक्षा असणार आहे. या दोन अपहार प्रकरणाव्यतिरिक्त इतर अपहारप्रकरणी तडजोड न करता शिस्त व आवेदन पद्धतीनुसार कार्यवाही करायची आहे.

विनातिकीट प्रवास किंवा तिकीट न देणे अशी वाहकाकडून झालेली अनियमितता याची माहिती देण्यास तपासणी कर्मचाऱयाने कसूर केल्यास तसेच कोणत्याही वाहक अथवा चालकाने केलेल्या कोणत्याही अनियमितता, गैरवर्तणुकीचे कृत्य शोधण्यास व त्याची खबर देण्याचे तपासणी कर्मचाऱयाने टाळले अथवा त्यात कसूर केल्यास प्रथम प्रमादासाठी अंतर्भूत रकमेच्या 75 पट परंतु किमान 10 हजार एवढी नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी. द्वितीय प्रमादासाठी अंतर्भूत रकमेच्या 150 पट परंतु, किमान 20 हजार इतकी रक्कम वसूल करण्यात यावी व तृतीय व त्यानंतरच्या प्रमादासाठी शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार आरोपपत्र देऊन कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याबाबतची कार्यवाही करताना सध्या प्रलंबित असलेल्या तसेच यापुढील अपहार प्रकरणांसाठी कार्यवाही करता येणार आहे, यापूर्वीच्या निकाली निघालेल्यांचा विचार करता येणार नाही. ही सर्व कार्यपद्धती रा. प.चे कायमस्वरुपी धोरण म्हणून निश्चित करण्यात आले आहे.