|Monday, July 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हरणाची शिकार करणारे तिघे ताब्यात

हरणाची शिकार करणारे तिघे ताब्यात 

एक फरारी : दोन बंदूका, सत्तूर,दोन चाकू जप्त

प्रतिनिधी / खानापूर

खानापूर-अळणावर मार्गावर बिडीनजीक एका स्कॉर्पिओमधून शिकार केलेले हरण आणताना नंदगड पोलिसांनी शुक्रवारी सकाळी तिघांना ताब्यात घेतले. तर चौथा आरोपी फरारी झाला आहे. अटक केलेल्यांमध्ये परवेस समशेर (वय 37), शेख नवाज समशेर (38), नेदू कित्तूर (31) तिघेही रा. बिडी ता. खानापूर येथील आहेत. तर चौथा आरोपी समजन हुसैन (रा. शिर्सी) हा फरारी झाला आहे.

या चौघांनी मिळून गोल्याळी जंगलात एका हरणाची शिकार केली होती. शिकार केलेले हरण स्कॉर्पिओमधून घेऊन येत असल्याचा सुगावा नंदगड पोलिसांना लागला होता. नंदगडचे पोलीस उपनिरीक्षक यु. एस. आवटी व त्यांचे सहकारी शुक्रवारी पहाटेपासूनच बिडीजवळील कुबेर धाब्याजवळ पाळत ठेवून होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी स्कॉर्पिओ पोलिसांनी अडवून तपास केला असता त्यामध्ये शिकार केलेले हरण सापडले. याच वेळी चौथा आरोपी पोलिसांची नजर चुकवून पसार झाला.

पोलिसांनी या तिन्ही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. अधिक तपास केला असता सदर हरणाची शिकार गोल्याळी जंगलात केल्याचे त्यांनी कबूल केले. सदर हरण तीन वर्षाचे असून 25 किलो वजनाचे आहे. पोलिसांनी शिकारीसाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओs, एक डबल बारची बंदूक, एक सिंगल बार बंदूक, एक सत्तूर व दोन चाकू जप्त केले आहेत. तसेच हरणाची उत्तरणीय तपासणी करून अंत्यविधी उरकण्यात आला. दरम्यान चौथ्या आरोपीचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

Related posts: