‘पाटण अर्बन’ची 38 लाखांची फसवणूक प्रतिनिधी
प्रतिनिधी/ कराड
बनावट सातबारा उतारे व खोटय़ा सहय़ा करून पाटण अर्बन बँकेची 38 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी केसे-पाडळी (ता. कराड) येथील तिघांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा रामू शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
संदीप राजाराम पाटील-शिंदे, राजाराम विष्णू पाटील-शिंदे, रवींद्र राजाराम पाटील-शिंदे (तिघेही रा. केसे-पाडळी ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केसे-पाडळी येथील संदीप राजाराम पाटील व सहकर्जदार राजाराम विष्णू पाटील यांनी वीटभट्टी व्यवसायाकरिता 45 लाखांचे कर्ज मिळावे असा अर्ज पाटण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शनिवार पेठ शाखेत 26 डिसेंबर 2013 रोजी केला होता. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली होती. कर्ज मागणीचा अर्ज 28 डिसेंबर 2013 रोजी मुख्य कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. बँकेतील अधिकाऱयांच्या बैठकीत 20 लाख शेती विकासाकरिता व 20 लाख वीटभट्टी व्यवसायाकरिता कर्ज मंजूर केले. 10 जानेवारी 2014 रोजी करारपत्र, वचनचिठ्ठी व इतर कार्यवाही पूर्ण झाल्यावर 17 जानेवारी 2014 पर्यंत कर्जदाराच्या खात्यावर 38 लाख रुपयांची रक्कम वर्ग केली. ती रक्कम कर्जदाराने डिमांड ड्राफ्ट व रोखीने वेळोवेळी काढून घेतली. त्यानंतर कराड शाखेच्या वतीने बोजा नोंदीची कार्यवाही सुरू करण्यात आली असता त्यांना कर्जदारावर एका पतसंस्थेचे 25 लाखांचे कर्ज अगोदरच असल्याचे समजले. त्यांनी चौकशी केली असता कर्जदाराने बनावट कागदपत्रे व साताबारा उतारे देत खोटय़ा सहय़ा करून फसवणूक केल्याचे उघडकीस आले. हा प्रकार लक्षात आल्यावर पाटण अर्बन बँकेच्या अधिकाऱयांनी कराड शहर पोलिसात धाव घेऊन तिघांच्याविरोधात फिर्याद दाखल केली.