|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार

राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार 

प्रतिनिधी/ मडगाव

राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी व्यक्त केला आहे. लुईझिन फालेरो हे स्वता नावेली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून काल मतदानाच्या वेळी ते नावेलीत फेरफटका मारताना आढळून आले. यावेळी त्यांची भेट घेतली असता, त्यांनी वरील प्रतिक्रीया व्यक्त केली.

नावेली मतदारसंघात गोवा फॉरवर्डने पाठिंबा दिलेले उमेदवार सिप्रू यांच्याशी लुईझिन फालेरो यांचा मुकाबला होत आहे. या संदर्भात बोलताना श्री. फालेरो म्हणाले की, नावेलीत चमत्कार होणार आहे. आपला विजय हा नक्की आहे. आपल्याला प्रचारासाठी अवघे दहा दिवस मिळाले तरी मतदारांकडून मिळालेल्या प्रतिसादातून आपण समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक आपण ही निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हतो. तरी सुद्धा मतदारांच्या आग्रहाखातर आपण निवडणूक लढवित आहे व हेच मतदार आपल्याला विजयी करून देतील.

दवर्ली मतदान केंद्रावर नावेलीतील मगोचे उमेदवार सत्यविजय नाईक हे उपस्थित होते. त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, आपल्याला या मतदारसंघात विजयाची संधी आहे. आपल्याला किमान सात ते आठ हजार मते पडतील असा दावा त्यांनी केला. आपल्या विरोधात असलेल्या उमेदवारांमध्ये मतविभागणी होत असल्याने, त्यांचा लाभ आपल्यालाच मिळणार आहे.

मंत्री आवेर्तान फुर्तादोचे भाऊ शुबर्ट हे दवर्ली मतदारन केंद्रावर उपस्थित होते, ते म्हणाले की, मतदान चांगले होत असून आपल्या भाऊला बऱयापैकी मतदान होणार आहे. याच केंद्रावर काँग्रेसच्या प्रतिमा कुतिन्हो देखील होत्या, त्यांनी राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली. लुईझिन फालेरोचे निवडणूक एजंट अतुल वेर्लेकर यांनी देखील काँग्रेसला मतदार संधी देतील असा विश्वास व्यक्त केला.

फातोडर्य़ात 12 हजार मते प्राप्त करू : दामू

संपूर्ण गोव्याचे लक्ष लागून राहिलेल्या फातोर्डा मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई व भाजपचे दामू नाईक यांच्यात हाय वोल्टेज लढत होत आहे. दामू नाईक यांनी काल चौगुले महाविद्यालयात मतदान केले. यावेळी आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना दामू नाईक म्हणाले की, आपल्याला या निवडणुकीत किमान 12 हजार मते नक्कीच मिळतील व आपण विजयी होणार आहे हे नक्की आहे.

गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ते व नगरसेवक टीटो कार्दोज हे बोर्डा येथील मल्टिपर्पज मतदान केंद्रावर उपस्थित होते, त्यांनी गोवा फॉरवर्डचे उमेदवार विजय सरदेसाई हेच विजयी होतील असा दावा केला. याच मतान केंद्राच्या बाहेर मडगावच्या नगराध्यक्ष बबिता आंगले यांचे पती दिलीप प्रभुदेसाई हे ठाण मांडून हेते.

सांगेत आपला विजय नक्की

सांगे मतदारसंघाचे आमदार सुभाष फळदेसाई हे काल रिवण परिसरावर लक्ष केंद्रीत करून होत. त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, गेल्या वेळेच्या पक्षा प्रत्येक मतदान केंद्रावर यावेळी आपल्याला प्रत्येकी 50 मतांची अतिरिक्त आघाडी मिळणार आहे. आपला विजय नक्की असून किमान 3 हजार मतांच्या आघाडीने जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार श्री. फळदेसाई यांच्या पत्नी सौ. अलका फळदेसाई या सांगे शहरातील भाग शिक्षणाधिकारी कार्यालयातील मतदान केंद्रावर लक्ष ठेवून होत्या. त्यांची भेट घेतली असता, त्यांनी शुक्रवारी घडलेल्या घटणेची माहिती देताना सांगितले की, आपण कारमधून मतदारसंघात फेर फटका मारत असताना, आपल्याला वाटेत दोघांनी अडविले व गाडीत पैसे असल्याचा आरोप करू लागले. या गोंधळात आणखीन दहा-पंधरा मुले आली व त्यांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. नंतर पोलिसांना बोलावून घेतले असता सर्वानी धुम ठोकली.

सावर्डेत मगोचे दीपक पाऊसकरच बाजी मारणार

सावर्डे पंचायत क्षेत्रात दीपक पाऊसकर यांना मोठय़ा प्रमाणात मतदान झाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला. यावेळी सावर्डेतून मगोचे दीपक पाऊसकर हेच विजयी होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. गेल्या वेळी हेच कार्यकर्ते गणेश गावकर सोबत होते. मात्र, यावेळी गणेश गांवकरना उमेदवारी देऊ नये अशी मागणी पक्षाकडे केली होती. पण पक्षाने ही मागणी फेटाळल्याने संतप्त झालेले कार्यकर्ते गणेश गांवकरच्या विरोधात उभे ठाकल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यांनी सर्व पंचायत क्षेत्रातील टक्केवारी सुद्धा यावेळी दिली. त्यात धारबांदोडा 75 टक्के, काले 80 टक्के, सावर्डे 80 टक्के, कुळे 75 टक्के, मोले 60 टक्के, साकोर्डा 60 टक्के व दाभाळ 70 टक्के मते मगोला मिळणार असल्याचे सांगितले.

मगोचे उमेदवार दीपक पाऊसकर यांचे बंधू संदीप पाऊसकर या ठिकाणी ठाण मांडून होते. मात्र, भाजपचा एक कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी आढळून आला नाही.

Related posts: