|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभारावर ताशेरे

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभारावर ताशेरे 

प्रतिनिधी / बेळगाव

जिल्हा पंचायतीच्या शिक्षण व आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत प्रामुख्याने जिल्हय़ातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभाराबद्दल चर्चा झाली. आणि जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. अप्पासाहेब नरट्टी यांना धारेवर धरण्यात आले. शनिवारी जिल्हा पंचायतीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिक्षण व आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष मोहन मोरे होते.

बैठक सुरू होताच मोहन मोरे यांनी बेळगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभाराचा विषय उपस्थित केला. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दरवर्षी अनुदान मंजूर होते. मात्र याचा नेमका कशासाठी वापर होत आहे, याची माहिती देण्यात येत नाही. संबंधित ग्रामपंचायतींनाही याबाबतची माहिती नसते. यामुळे या अनुदानाचा वापर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुधारणांसाठी होत आहे का? असा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर वेळेवर उपस्थित होत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. यासाठी वेळेवर हजर न राहणाऱया डॉक्टरांना निलंबित करावे, अशी सूचना मोरे यांनी केली. यावर जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नरट्टी यांनी निलंबित नको तर त्यांचा एक दिवसाचा पगार कपात करा, असे सुचविले. आधीच प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर मिळेनासे झाले आहेत. यामुळे राज्य सरकारने आरोग्य केंद्रात आयुष डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा आदेश दिला आहे. यानुसार सध्या 34 आयुष डॉक्टरांची जिल्हय़ात नियुक्ती करण्यात आल्याचे डॉ. नरट्टी यांनी सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकाऱयांच्या या उत्तराने अध्यक्ष मोहन मोरे संतप्त झाले. कोणाला विचारून या आयुष डॉक्टरांची नियुक्ती केली? अध्यक्ष या नात्याने मला याबाबत काहीच माहिती देण्यात आली नाही, असे सांगितले.

 प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा

अजित चौगुले यांनी मंजूर झालेल्या अनुदानातून प्राथमिक आरोग्य केंद्रात एक झाडूही खरेदी केला जात नसल्याचे सांगितले. फकिरप्पा हदण्णवर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असून रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगण्यात येते. अशा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

जिल्हा शिक्षणाधिकारी धारेवर

शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित झालेल्या चर्चेत जिल्हा शिक्षणाधिकारी एस. वाय. हळंगळी यांनाही धारेवर धरण्यात आले. आरटीईअंतर्गत प्रवेश मोफत असताना खासगी शाळांकडून आरटीई व्यवस्था नसल्याचे सांगत प्रवेश फी आकारण्यात येत आहे. मात्र अशा शाळांवर शिक्षण खात्याच्यावतीने कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याबद्दल  अजित चौगुले यांनी त्यांना फैलावर घेतले.

अध्यक्ष मोहन मोरे यांनी जिल्हय़ातील धोकादायक बनलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे का? अशी विचारणा केली. यावर जिल्हा शिक्षणाधिकाऱयांनी बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 24 तर चिकोडी जिल्हय़ात 10 शाळांच्या नव्या इमारतींसाठी अनुदान मंजूर झाले आहे. परंतु अद्यापही इमारतींच्या दुरुस्तीसाठी अनुदान मंजूर झाले नसल्याचे यावेळी सांगितले.

 बैठकीस स्थायी समितीच्या सदस्या विजया सोण्णद, सदस्य सुदर्शन खोत, जि. पं. उपसचिव एन. डी. अचनूर, योजनाधिकारी एफ. ए. दोडमनी आदी उपस्थित होते.