|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सीरियात 13000 कैद्यांना फाशी

सीरियात 13000 कैद्यांना फाशी 

ऍम्नेस्टी इंटरनॅशनलकडून अहवालाद्वारे खुलासा

वृत्तसंस्था/  लंडन

सीरियन राष्ट्राध्यक्ष बश-अल-असाद यांच्या 13000 विरोधकांना सरकारी तुरुंगात गुपचुपपणे फाशी देण्यात आली आहे. मंगळवारी ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने आपल्या अहवालात याचा खुलासा केला आहे.

सुरक्षा कर्मचारी, कैदी आणि न्यायाधीशांसहित 84 प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखतीवर हा 48 पानी अहवाल आधारित आहे. या अहवालानुसार 2011 आणि 2015 दरम्यान दमास्कसनजीक सैदनाया लष्करी तुरुंगात सामूहिक फाशी देण्यात आली आणि अजूनही तेथे मृत्यूचा खेळ सुरू आहे. वकील आणि सुनावणीशिवायच केवळ यातना देऊन गुह्याची कबुली घेतली जाते आणि नंतर त्यांना फासावर लटकाविण्यात येत असल्याचे अहवालात नमूद आहे.

सोमवारी आणि बुधवारी ज्यांची नावे पुकारली जायची त्यांना दुसऱया ठिकाणी हलविले जात असल्याचे सांगितले जायचे. यानंतर त्यांना तुरुंगाच्या तळघरात नेऊन मोठा छळ केला जायचा. पूर्ण प्रक्रियेत त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असायची. एक मिनिटांआधी त्यांना शिक्षेची कल्पना देण्यात येत होती. फाशीनंतर मृतदेह गोपनीय पद्धतीने पुरले जात असत.

 

 त्यांच्या कुटुंबीयांना याची कल्पना देणे टाळले जायचे असे अहवालात म्हटले गेले आहे.

भयावह स्थितीचे वर्णन करणाऱया पीडितांच्या वक्तव्यांद्वारे लंडनच्या एनजीओने अध्ययन केले. सीरियाच्या तुरुंगात मागील 5 वर्षांमध्ये 130000 जणांना फाशी देण्यात आल्याचा निष्कर्ष एनजीओने काढला आहे.

उदध्वस्त करण्याचे धोरण

सीरियन सरकारचे हे कृत्य युद्धगुन्हे आणि माणुसकी विरोधात असल्याचे ऍम्नेस्टीने म्हटले आहे. कैद्यांना वेळोवेळी यातना देऊन त्यांना भोजन, पाणी तसेच वैद्यकीय देखभालीपासून वंचित ठेवत उद्ध्वस्त केल्याचा आरोप एनजीओने केला.