|Monday, June 17, 2019
You are here: Home » क्रिडा » विराट कोहली वनडेतील सर्वोत्तम फलंदाज

विराट कोहली वनडेतील सर्वोत्तम फलंदाज 

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगकडून मुक्तकंठाने प्रशंसा

वृत्तसंस्था/ मेलबर्न

ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार व माजी फलंदाज रिकी पॉटिंगने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची मुक्तकंठाने प्रंशसा केली आहे. सिडनी मॉर्निग हेराल्ड या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विराट हा एकदिवसीय क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे पॉटिंगने म्हटले आहे. विराट माझ्यासाठी सहा-सात महिन्यापूर्वीच सर्वोत्तम फलंदाज झाला होता आणि आजही कायम आहे.

2016 या वर्षात विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी करताना वेस्ट इंडिज, न्यूझीलंड व इंग्लंडला धूळ चारली आहे. कसोटीतील नेतृत्वानंतर वनडे व टी-20 क्रिकेटमध्ये विराटसेनेने इंग्लंडविरुद्ध मालिका विजय संपादन केला आहे. भारताच्या तिन्ही प्रकारच्या संघाचे नेतृत्व कोहलीकडे आल्याने आगामी काळात त्याचे नेतृत्वगुण प्रकर्षाने पुढे येतील. असे असले तरी इतक्यातच त्याला कसोटीतील महान फलंदाज म्हणता येणार नाही, असे पॉटिंगने सांगितले. वनडे क्रिकेटमधील त्याची कामगिरी खूपच चांगली आहे, पण कसोटी क्रिकेटसाठी त्याला आणखी वेळ द्यावा लागेल. सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, जॅक कॅलिससारख्या शंभरहून अधिक कसोटी खेळलेल्या खेळाडूंची महान श्रेणीत गणना होते. विराटने तर अद्याप त्यांच्या निम्मेही सामने खेळलेले नाहीत, असेही तो म्हणाला.

आगामी भारत दौरा ऑस्ट्रेलियासाठी आव्हानात्मक

ऑस्ट्रेलियाच्या आगामी भारत दौऱयासाठी पॉटिंगने विराट कोहलीला रोखण्यासाठी व्यूहरचना करण्याची सूचना केली आहे. कोहलीवर अंकूश ठेवण्यासाठी ऑसी गोलंदाजानी कठोर सराव करायला हवा. कोहली दबावाखाली आला की आणखी आक्रमक होवू फलंदाजी करतो आणि प्रतिस्पर्धी संघासाठी घातक ठरते, याचाही विचार ऑसी गोलंदाजानी करायला हवा असेही पॉटिंग यावेळी म्हणाला. इंग्लंडविरुद्ध मालिकेत कोहलीने ज्या पध्दतीने फलंदाजी केलेली आहे ते पाहता त्याला रोखण्यासाठी स्मिथ ऍन्ड कंपनीला मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत. शिवाय, भारतातील फिरकी खेळपट्टय़ा पाहता ऑसी फलंदाजाना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे, असेही त्याने यावेळी सांगितले.