|Saturday, February 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पडतेंचे नाव दोन ठिकाणच्या मतदार यादीत!

पडतेंचे नाव दोन ठिकाणच्या मतदार यादीत! 

ओरोस : पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय पडते यांचे कुडाळ नगर पंचायत व नेरुर गावची मतदार यादी अशा दोन ठिकाणी नाव दिसून येत आहे. मात्र काँग्रेस उमेदवार ऍड. विवेक मांडकुलकर यांनी याबाबतची घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकारी विकास सूर्यवंशी यांनी फेटाळल्याने त्यांच्या या निर्णयाविरोधात ऍड. विवेक मांडकुलकर यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले आहे.

पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून पडते यांनी, तर काँग्रेसचे उमेदवार म्हणून ऍड. मांडकुलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र पडते यांचे नाव कुडाळ नगर पंचायतीची मतदार यादी आणि नेरुर मतदार यादी या दोन ठिकाणी असल्याचे दिसून येत आहे. एकाच व्यक्तीचे नाव दोन मतदारसंघांच्या यादीत समाविष्ट असल्यास त्याला निवडणूक प्रक्रियेत भाग घेता येत नाही. पडते यांचे नाव दोन ठिकाणी असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवावा, अशी हरकत ऍड. विवेक मांडकुलकर यांनी 7 फेब्रुवारी रोजी छाननीच्या वेळी घेतली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी विकास सूर्यवंशी यांनी ही हरकत फेटाळून लावली होती व पडते यांची उमेदवारी ग्राह्य ठरवली होती.

दरम्यान मार्च 2016 रोजीच्या कुडाळ नगर पंचायतीच्या निवडणुकीत पडते यांनी मतदान केले होते. तसेच 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध झालेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय यादीत पडते यांचे नाव कुडाळ व नेरुर या दोन ठिकाणच्या मतदार यादीत समाविष्ट असल्याचे दिसून येत आहे, तर 21 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या जि. प. व पं. स. निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार यादीत त्यांचे नाव नेरुर मतदार यादीत दिसत आहे. दरम्यानच्या कालावधीत त्यांनी कुडाळ नगर पंचायत क्षेत्राच्या मतदार यादीतून नाव कमी केल्याचा पुरावा सादर करावा अन्यथा त्यांची उमेदवारी रद्द करावी, यासाठी ऍड. मांडकुलकर यांनी सूर्यवंशी यांच्या निर्णयाविरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात अपिल दाखल केले आहे. त्यामुळे पडते यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून न्यायालयाच्या निर्णयाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related posts: