|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दक्षिण गोव्यात मुलांना बेकायदा दत्तक घेण्याचे प्रकार घडकीस

दक्षिण गोव्यात मुलांना बेकायदा दत्तक घेण्याचे प्रकार घडकीस 

प्रतिनिधी/ मडगाव

गोव्यात मुलांची तस्करी होत असल्याचे सांगितले जात होते. खास करून वास्को परिसरात अशा घटना घडल्याचे सांगितले जात असले तरी या प्रकरणाचा कधीच सखोल तपास झाला नव्हता. मात्र, सासष्टी तालुक्यात मुलांना लाखो रूपये मोजून बेकायदा दत्तक घेण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. दोन वेगवेळय़ा प्रकरणांतून दोन मुलांची सुटका करण्यात आल्याची माहिती बायलांचो एकवोटच्या अध्यक्ष श्रीमती आवदा व्हिएगस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लांच्छनास्पद बाब म्हणजे एका प्रकरणात गोव्याच्या शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या पदावर काम केलेल्या एका शिक्षण उपसंचालकाचा समावेश आहे. या दोन्ही प्रकरणाचा तपास लावण्यात मडगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक चेतन पाटील, उपनिरीक्षक अमीन, प्रतिक, नाथन आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका व सिद्धी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. सुटका करण्यात आलेले दोन्ही लहान मुलगे आहेत.

दत्तक घेतलेल्या बालकाचे केले धर्मांतरण

दोन प्रकरणांपैकी एका प्रकरणात एका नेपाळी जोडप्याकडून दत्तक घेण्यात आलेल्या मुलांसाठी पैसेही मोजण्यात आले आहेत. हे नेपाळी जोडपे हिंदु असले तरी दत्तक घेणाऱयांनी त्याचा ‘बाप्तिजम’ करून त्याचे ख्रिश्चन धर्मात रूपांतर केले आहे. मात्र, त्याच्या जन्माची नोंदणी त्यांच्या मुळ आई-वडिलांनी केली आहे. त्यामुळे हे दत्तक प्रकरण पूर्णपणे बेकायदेशीर ठरत असल्याचा दावा श्रीमती व्हिएगस यांनी केला आहे.

सर्व कायदेशीर सोपस्कारांना दिला फाटा

मुल दत्तक घेताना अधिकृत संस्थेकडून घेणे आवश्यक असते, मुल दत्तक घेताना विविध सोपस्कार पूर्ण करावे लागतात. मात्र, या प्रकरणात असे काहीच घडलेले नाही. व्हिएगस यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, कुतडरी परिसरातील एका ख्रिश्चन कुटुंबातील जोडप्याला मुल नव्हते. मुल व्हावे म्हणून त्यांनी औषधोपचार केले. पण, त्यांना मुल झाले नाही. एक दिवस रस्त्यात त्या ख्रिश्चन बाईची ओळख नेपाळी महिलेकडे झाली. पहिल्या भेटीतच सर्व विचारपूस करण्यात आली. नंतर तिच्याकडची ओळख त्या ख्रिश्चन बाईने अधिक वाढविली.

मुलाच्या जन्मापुर्वीच त्याला घेतले विकत

दरम्यानच्या काळात त्या नेपाळी महिलेला मुल झाले. जेव्हा ती गरोदर होती, त्या काळात त्या ख्रिश्चन बाईने दर महिना तिला वीस हजार रूपये देण्यास प्रारंभ केला. तिला जवळपास 1 लाख 80 हजार रूपये देण्यात आले. बऱयाच वेळा हे पैसे घेण्यास त्या नेपाळी बाईने नकार दर्शविला तरी सुद्धा जबरदस्तीने पैसे देण्याचे प्रकार घडल्याची माहिती व्हिएगस यांनी दिली.

मुलाच्या मातेने सहा महिने केला संघर्ष

जेव्हा नेपाळी महिलेने मुलाला जन्म दिला, त्यानंतर अवघ्या चार दिवसात या मुलाला ख्रिश्चन जोडप्याने आपल्या ताब्यात घेतले. त्याला काविळ झाल्याचे सांगून दुसऱया डॉक्टरकडे नेण्याचा बहाणा केला व मुल आपल्या घरी नेले. तब्बल सहा महिने ती नेपाळी महिला आपल्या मुलांसाठी संघर्ष करीत होती.