|Thursday, June 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ट्रम्प यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप

ट्रम्प यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका एका क्लोदिंग ब्रँड चालविते. अलिकडेच नॉर्डस्ट्रॉम या विक्रीविषयक वेबसाइटने इवांकाच्या क्लोदिंग लाइनचे कपडे आपल्या येथून विक्रीतून हटविले. यावरून ट्रम्प यांनी ट्विट करत नॉर्डस्ट्रॉमची निंदा केली.  याप्रकरणी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका होत आहे. हा ट्विट करून ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन केले असून हे प्रकरण फेडरल एथिक्स ऑफिसकडे सोपविले जावे अशी मागणी डेमोक्रेटिक खासदारान केली. ट्रम्प  आपल्या कौटुंबिक व्यवसायासाठी पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप होतोय.

वाद झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे देखील ट्विट करण्यात आला. सिनेटमधील डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्या नॅन्सी पलोसी यांनी देखील ट्रम्प यांच्यावर टीका केली. माझ्यामते हे अनुचित आहे. परंतु ट्रम्प हे पूर्णपणे एक अनुचित राष्ट्राध्यक्ष आहेत. ते तेच करत आहेत, जे ते करू शकतात अशा शब्दात पलोसी यांनी टीका केली.

नॉर्डस्ट्रॉमने मागील आठवडय़ात इवांकाच्या लेबला विक्रीपासून हटविण्याची घोषणा केली होती. या लेबलची विक्री खूपच कमी होत असल्याचा दावा नॉर्डस्ट्रॉम या ऑनलाईन वेबसाईटने केला होता. 2000 पेक्ष अधिक ब्रँड्सनाच केवळ वेबसाईटवर स्थान आहे. प्रत्येक ब्रँडची विक्री आणि त्याच्या कामगिरीची वेळोवेळी समीक्षा करणे आणि त्यानुसार निर्णय घेणे आमच्या व्यवसायाचा भाग असल्याचे कंपनीकडून म्हटले गेले.

याआधी ट्रमविरोधी संघटना ‘ग्रॅब योर वॉलिट’ने अनेक आठवडे बहिष्कार मोहीम चालविली. तसेच संघटनेने नॉर्डस्ट्रॉमकडे ट्रम्प परिवारासोबतचा आपला व्यापार संपुष्टात आणावा अशी मागणी केली. इवांकाच्या ब्रँडला विक्रीपासून हटविण्याच्या 3 दिवसांआधीच नॉर्डस्ट्रॉमने ट्रम्प यांच्या मुस्लिमबंदीचा विरोध केला होता.

व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण

ट्रम्प यांना आपल्या कुटुंबासाठी उभे ठाकण्याचा आणि त्यांचा व्यवसाय तसेच यशाचे कौतुक करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणी जर त्यांच्या धोरणाविरोधात त्यांच्या परिवाराच्या सदस्याला लक्ष्य बनवत असेल तर ते अस्वीकारार्ह आहे. एक पिता म्हणून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना परिवाराला साथ देण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्टीकरण व्हाइट हाउसचे माध्यम सचिव सीन स्पायसर यांनी दिले.