|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » उद्योग » जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअरबाजारात वधार

जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअरबाजारात वधार 

 मुंबई / वृत्तसंस्था

चांगल्या जागतिक संकेतांमुळे आणि आयटी समभागांमधील खरेदीमुळे आठवडय़ाच्या चौथ्या व्यावसायिक दिवसात म्हणजेच गुरुवारी शेअरबाजारात किरकोळ वधार नोंदला गेला. मुंबई शेअरबाजार निर्देशांक 40 अंकांनी वधारून 28329 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजार निर्देशांक 9 अंकांनी तेजीत येत 8778 अंकांवर बंद झाला आहे.

गुरुवारच्या सत्रात छोटय़ा आणि मध्यम कंपन्यांमध्ये खरेदी दिसून आली. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.23 टक्क्यांच्या तेजीसह 13507 च्या स्तरावर बंद झाला. तर निफ्टी मिडकॅप 0.44 टक्क्यांनी तेजीत आला. बीएसईचा स्मॉलकॅप 0.19 टक्क्यांनी वधारत 13583 अंकांवर बंद झाला.

गुरुवारी आयटी समभागांमधील खरेदीमुळे बाजाराला मदत झाली. निफ्टी आयटी निर्देशांक 1.61 टक्क्यांच्या तेजीसह 10168 अंकांवर बंद झाला. बँकिंग समभागांमधील प्रॉफिट बुकिंगमुळे बाजारात काही प्रमाणात दबाव दिसून आला. यामुळे निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 1.02 टक्क्यांनी घसरत 3404 च्या स्तरावर बंद झाला. बँक ऑफ इंडिया वगळता सर्व बँकेंचे समभाग खाली आले. सर्वाधिक घसरण यूनियन बँकेत 8.17 टक्के एवढी झाली.

मुंबई शेअरबाजारात टीसीएस सर्वाधिक 2.72 टक्क्यांनी मजबूत झाला. तर याशिवाय हीरो मोटोकॉर्प, इन्फोसिस, गेल, महिंद्रा अँड महिंद्राच्या समभागांमध्ये 1 टक्क्यांपेक्षा अधिक वधार नोंदला गेला. तर सिप्ला, टाटा स्टील आणि एनटीपीसीच्या समभागांमध्ये 2 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे.

मिडकॅप समभागांमध्ये ओरेकल फायनान्स, अदानी पॉवर, बँक ऑफ इंडिया, डिवीज लॅब आणि टाटा कम्युनिकेशन्स सर्वाधिक 2-2.9 टक्क्यांनी वधारले. परंतु मिडकॅप समभागांमध्ये यूनियन बँक नाल्को, इंडियाबुल्स हाउसिंग, ओरिएंटल बँक आणि बजाज फिनसर्व सर्वाधिक 1.8-7.2 टक्क्यांनी खाली आले.

बुधवारच्या व्यावसायिक सत्रात अमेरिकेचा शेअरबाजार किरकोळ घसरणीसह बंद झाला. अमेरिकन बाजारातील बहुतेक कंपन्यांची कामगिरी चांगली दिसून आली आहे, यामुळे औद्योगिक समभागांमध्ये तेजी आढळली. डाओ जोन्स 36 अंकांनी कमजोर होत 20054 च्या स्तरावर बंद झाला तर नॅस्डॅक 0.15 टक्क्यांनी वधारून 5682.5 अंकांवर बंद झाला आहे.