|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कोळंब पुलाच्या पिलर्सची अंडर वॉटर तपासणी

कोळंब पुलाच्या पिलर्सची अंडर वॉटर तपासणी 

मालवण : अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या कोळंब पुलाची गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या पथकाने तपासणी केली. मुंबई येथील ‘एसएएस एंटरप्रायझेस’ या खासगी संस्थेच्या तज्ञांनी डिजीटल तंत्रज्ञानाच्या आधारे व स्कुबा डायव्हिंग टिमच्या साथीने पुलाच्या पिलर्सची अंडर वॉटर तपासणी केली. पुलाच्या सर्व पिलर्सची तपासणी दोन दिवस चालणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता योगराज देवरे यांनी दिली.

 कोळंब पुलाच्या तपासणीस पहिल्या टप्प्यात अंडर वॉटर पाणी, पुलाच्या पिलर्सच्या पाण्याखालील मजबुतीची पाहणी करण्यात येणार आहे. यात पुलाला पडलेल्या भेगा व तडे यांची यंत्राच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. दुसऱया टप्प्यात पिलर्सचे आयुर्मान तपासताना नवीन पूल कशा पद्धतीने उभारण्यात यावे, याची परिपूर्ण माहिती असलेला अहवाल संस्था शासनाच्या बांधकाम विभागाजवळ देणार आहे.

  कोळंब पुलाची दुरुस्ती व्हावी, की नव्याने पूल उभारण्यात यावेत. याबाबत या पाहणी अहवालातून निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यामुळे धोकादायक बनलेल्या कोळंब पुलाला या अहवालावरून गती मिळेल, असा दावा एंटरप्रायझेसच्या संजय भोसले यांनी केला. स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून कोळंब पुलाची पाहणी करण्यात आली. यात सुपरवायझर दिनेश कुमार, जितेंद्र सिंग, स्कुबा डायव्हर, मनोज कुमार आदींची टीम सहभागी झाली होती.