|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘बाबा सारखे मारतात म्हणून मी पळून आलो!’

‘बाबा सारखे मारतात म्हणून मी पळून आलो!’ 

सौ.जान्हवी पाटील /रत्नागिरी :

‘आई दिवसभर कामाला जाते, मला दोन छोटे भाऊ आहेत, त्यांना शाळेतून आल्यावर मी दिवसभर सांभाळतो, त्यातून वेळ मिळाल्यावर खेळायला जातो, मात्र मी खेळायला गेल्यावर बाबा खूप मारतात. मलाच बाबा सारखे का मारतात. म्हणून मी कोणालाही न सांगता घर सोडून भांडूपला मिळेल त्या ट्रेनमध्ये चढून रत्नागिरीला आलो, पण मला आता माझ्या आईची व भावांची आठवण येते मला घरी सोडा’ अशी  भावनाविवश करणारी व्यथा एका 12 वर्षाच्या चिमुरडय़ांनी रत्नागिरी रेल्वे पोलिसांसमोर मांडली.

   गुरूवारी रत्नागिरी रेल्वे स्थानकात दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान मांडवी एक्स्प्रेसमध्ये तिकिट तपासणीवेळी अधिकाऱयांना हा 12 वर्षाचा भावेश सदानंद दळवी नामक मुलगा सापडला. या मुलाकडे तिकिट वगैरे काही नव्हते, तिकिट तपासणी अधिकाऱयांनी त्वरीत रेल्वे पोलीसांना याची खबर दिली. त्यावेळी भावेश या चिमुरडय़ाची घाबरगुंडी उडाली होती. आता पोलीस आपल्याला सोडणार नाही या भीतीने तो खूप रडत होता. ‘आपल्याला घरी जायचे आहे’ हा एकच हट्ट धरून तो रडत होता. मात्र रेल्वे पोलीसांना त्याला शांत करत चौकशी केली. त्यावेळी तो रागाच्या भरात घर सोडून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

भावेश हा भांडूप येथील रहिवासी असून आईवडिल दोघेही मंजूर करतात असे त्याचे म्हणणे आहे. वडिल मिळेल ते काम करतात मात्र दारू जास्त पितात. मी इतर मुलांबरोबर खेळायला गेलो की, भरपूर मारतात. मला नितेश आणि रितेश अशी छोटी दोन भाऊ अशी सगळी माहिती भावेशने न घाबरता सांगितली. आई दिवसभर कामाला गेल्यावर मी या दोघांना सांभाळतो, माझी सकाळची शाळा असल्याने मी शाळेतून आल्यावर आई कामाला जाते असेही त्यांनी सांगितले. वडिल सारखे मारत असल्याने या मारहाणीला कंटाळून आपण भावेश गुरूवारी सकाळी 7.30 वाजता घराबाहेर पडला आणि मांडवी एक्स्प्रेसमध्ये चढला.

Related posts: