|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दिव्यांगांच्या सहाय्यासाठी तरूणाचा मुंबई-चेन्नई सायकल प्रवास

दिव्यांगांच्या सहाय्यासाठी तरूणाचा मुंबई-चेन्नई सायकल प्रवास 

 सत्यवान घाडे /गुहागर

आज सरकार अपंगांना विविध नावे देऊन त्यांच्यासाठी योजनाही राबवत आहे. मात्र या योजना त्यांना स्वावलंबी बनवण्यास सक्षम ठरत नाहीत. अनेक कंपन्यांचा 2 टक्के सीएसआर खर्ची टाकला जातो. मात्र तो योग्यठिकाणी खर्ची पडत नाही. शहरी भागापेक्षा गावामध्ये दिव्यांगांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. यामुळे अशा दिव्यांगांना सोशल मिडियाद्वारे सहाय्य करण्यासाठी मुंबई ते चेन्नईपर्यंतच्या 22 गावांमध्ये मुंबईच्या रोहन सभरवालचा सायकलने प्रवास सुरू झाला आहे.

मुंबईतून कोस्टलमार्गे कोकणात दाखल झाल्यावर गुहागरच्या अपंग पुनर्वसन संस्थेला रोहनने दिलेल्या भेटीवेळी ‘तरूण भारत’शी खास गप्पा मारल्या. मुंबई, पनवेल, अलिबाग, मजगाव, बोरली पंचतन, हरिहरेश्वर, दापोली व गुहागर असा त्याने सायकलने प्रवास करून गुहागरमध्ये अपंग पुनर्वसन संस्थेला भेट दिली. या भेटीमध्ये त्याने संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बाळासाहेब ढेरे यांची भेट घेऊन संस्थेच्या पदाधिकाऱयांजवळ चर्चा करून येथील अडचणी समजावून घेतल्या. ग्रामीण भागात दिव्यांगांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याची डॉक्युमेंटरी तयार करून त्याने ती आपल्या सोशल मिडियावर टाकून दिव्यांगांच्या सहाय्यासाठी आवाहन केले आहे. डॉ. ढेरे यांची दिव्यांगांच्या अडचणींविषयी व सहाय्यासाठी घेतलेली मुलाखतही त्याने आपल्या सोशल मिडियावर टाकली आहे. आपल्या कमाईतला छोटासा हिस्सा जरी या दिव्यांगांसाठी दिला तर यासारखे पुण्यकर्म नाही असे रोहनचे मत आहे. रोहन हा डिप्रेशनच्या दु:खातून गेल्याने त्याला दिव्यांगांच्या त्यावेळच्या परिस्थितीचा अनुभव आहे. याच अनुभवाने त्याने दिव्यांगांसाठी काम करण्याची इच्छा जागृत झाली आणि त्याने मुंबई येथे विविध कार्यक्रम आयोजित करून त्याद्वारे दिव्यांगांना मदत करण्याचे काम सुरू केले आहे.