|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अवैध वाळू वाहतूक करणाऱयावर चोरीचा गुन्हा दाखल

अवैध वाळू वाहतूक करणाऱयावर चोरीचा गुन्हा दाखल 

दंड न भरल्याने गुहागर पोलिसांत तक्रार

नरवण-पंधरवणे येथे वाळू उपशाला आळा घालण्यासाठी घातला बांध

गुहागर / प्रतिनिधी

नरवण-पंधरवणेत खुलेआम होणाऱया वाळू उपसा व चोरीला आळा घालण्यासाठी नरवण येथील तलाठय़ांनी पुन्हा रस्त्यावर आडवा बांध घातला आहे, तर वाळू वाहतूक करताना पकडल्या गेलेल्या वाहनचालकाने दंड भरण्यास नकार दिल्याने अखेर येथील पोलीस स्थानकात त्याच्या विरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील महसूल विभागाच्यावतीने अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. गेल्या आठ दिवसांत नरवण-पंधरवणे येथील अवैध वाळू उपसाप्रकरणी चौघांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यापैकी एकाला शनिवारी सकाळी 7 वाजता हेदवी येथे पकडले होते. मात्र त्या वाहनचालकाने दंड भरण्यास नकार दिला. यामुळे नरवणचे तलाठी प्रविण भालचीम यांनी चालक सुमित जयवंत राऊत याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी राऊत याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, नरवण-पंधरवणे येथून समुद्रावर वाहने उतरवून खुलेआम अवैधपणे समुद्राची पांढरी वाळू उपसा करून चोरून नेली जात होती. याअगोदर येथील तलाठी व सर्कल अधिकाऱयांनी येथील समुद्राकडे जाणाऱया रस्त्यावर स्वतः डबर आणून बांध घातला होता. मात्र येथील वाळू चोरी करणाऱयांनी तो बांध पुन्हा फोडला होता. याप्रकरणी चारजणांवर कारवाई झाल्यानंतर पुन्हा तलाठी व सर्कल अधिकाऱयांनी या रस्त्यावर डबराचा बांध घालून समुद्रावर जाणारा रस्ता बंद केला आहे.