|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कुपोषण मुक्ती मोहिमेत पालकांचेच असहकार्य

कुपोषण मुक्ती मोहिमेत पालकांचेच असहकार्य 

 

रत्नागिरी पंचायत समिती सभेत अधिकाऱयांनी मांडली व्यथा

बालविकास संगोपन केंद्रात मुलांची संख्या रोडावली

प्रशासनस्तरावर योग्य तोडगा काढण्याची गरज

रत्नागिरी /प्रतिनिधी

कुपोषित बालकांचा प्रश्न राज्यभरात ऐरणीवर आला आहे. कुपोषित बालकांना पोषण आहार उपलब्ध करुन त्यांचे योग्य संगोपन होण्याच्या दृष्टीने प्रशासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. पण आता या कुपोषणमुक्तीच्या मोहिमेत लोकसहभाग मिळत नसल्याची खंत एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या सर्वेक्षणतील अधिकाऱयांना येत आहे. कमी वजनाच्या बालकांना बालकविकास केंद्रात उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी त्या मुलांचे पालक धजावत नसल्याची कैफियत पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडण्यात आली आहे.

रत्नागिरी पंचायत समितीची सभा सभापती महेश उर्फ बाबू म्हाप यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. या सभेत हा मुद्दा उपस्थित झाला. कुपोषित बालकांचे निर्मुलन करण्यासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत जोरदार मोहीम राबवली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हाभरात करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार जिह्यात यापूर्वी कमी वजनाच्या अनेक बालकांवर योग्य ते उपचार करण्यात आलेले आहेत. तरीही ही मोहीम वारंवार हाती घेण्यात येत असताना तीव्र व कमी वजनाच्या बालकांना बाल संगोपन केंद्रात दाखल करण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे. प्रत्येक गावात कुपोषणमुक्तीसाठी जिल्हाभरात विशेष मोहीम राबवण्यात येऊन पूर्वी कुपोषित बालकांना आवश्यकतेनुसार पोषण आहार देण्यासाठी पूर्वी शासनाची बाल विकास केंद्रे सुरु करण्यात आली.

जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी शासनपातळी गेले काही दिवस जोरदार प्रयत्न होत आहेत. जिल्हयात तीव्र कुपोषित (सॅम) व (मॅम) बालकांची टक्केवारी टक्केवारी गेल्या पाच वर्षात कमी-जास्त होत आहे. कुपाषित बालके आढळून आल्यानंतर त्यांच्यासाठी पोषण आहार सुरु केला जातो. बालविकास संगोपन केंद्रात अशा कमी वजनाच्या बालकांना दाखल करून घेतल्यानंतर त्यांच्यावर 14 दिवस उपचार केले जातात. त्या मुलांचे आरोग्य तपासणी, वेळेवर उपचार, दरदिवशीचा रिपोर्ट तयार केला जातो. मुलांना यावेळी पौष्टिक आहारही दिला जातो. मुलांसोबत राहणाऱया पालकाला दर दिवसाची मजूरी म्हणून 100 रु. मानधनही दिले जाते. अशा मुलांना उपचारासाठी केंद्रापर्यंत नेणे व उपचार झाल्यानंतर पुन्हा घरी सोडण्यासाठी प्रशासनस्तरावर वाहनाचीही व्यवस्था केली जात आहे.

पण या मोहिमेसमोर आता पालकवर्गाची तयार न होणारी मानसिकता मोठा अडसर ठरू लागली आहे. कमी वजनाच्या बालकांना बालविकास संगोपन केंद्रात दाखल करून घेण्यासाठी प्रशासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. पण आपले मुल कुपोषित असल्याची भावना पालकांच्या मनात सतावत आहे. त्यामुळे पालकवर्ग मुलाला दाखल करून घेण्यास धजावत नसल्याने ही मोहीम राबवणाऱया अधिकाऱयांसमोर पेच निर्माण झाला आहे.

Related posts: