|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नवा पक्ष स्थापणार दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत ?

नवा पक्ष स्थापणार दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत ? 

भाजपकडून मिळू शकते समर्थन   तामिळनाडूच्या राजकारणाला नवे वळण

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूत वर्तमान राजकीय संकटादरम्यान एक मोठे वृत्त समोर आले आहे. दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत राजकारणाच्या जगात पाऊल ठेवू शकतात अशी चर्चा पसरली आहे. सूत्रानुसार रजनीकांत स्वतःचा राजकीय पक्ष बनवू शकतात, ज्यासाठी त्यांना भाजपची साथ मिळण्याची चिन्हे आहेत. भाजप दक्षिण भारताच्या या महत्त्वपूर्ण राज्यात आपला विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे.

66 वर्षीय रजनीकांत यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक एस. गुरुमूर्ति नवा पक्ष बनविण्यासाठी प्रेरित करत आहेत. तामिळनाडूतील वर्तमान राजकीय स्थितीमुळे रजनीकांत नाराज आहेत असे जाणकारांचे मानणे आहे. याचमुळे ते राजकारणात येण्याबाबतचे कयास गतिमान झाले आहेत.

राजकारणातील हवेची दिशा बदलणार

सूत्रानुसार संघ विचारक एस. गुरुमूर्ति भाजप आणि रजनीकांतला एका मंचावर आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गुरुमूर्ति यांच्यानुसार तामिळनाडूत रजनीकांतला सर्व वयोगटातील लोकांचे प्रेम लाभले आहे. वर्तमान काळात ज्या स्थितीतून राज्याचे राजकारण चालले आहे, अशा स्थितीत रजनीकांत राजकारणात आल्याने ते मोठी शक्ती म्हणून उदयास येऊ शकतात.

भाजपची नजर तामिळनाडूवर

भाजपला तामिळनाडूत फारसे स्थान नाही. अशा स्थितीत राज्यात आपले स्थान बनविण्यासाठी रजनीकांत यांची राजकारणात प्रवेश करण्याबाबत समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जयललितांच्या निधनानंतर भाजपच्या या प्रयत्नांना मोठा वेग आला आहे. परंतु 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतरही रजनीकांत यांनी राजकारणात सक्रीय रुपाने सामील होण्यास नकार दिला होता.

नो एंट्रीचा सल्ला

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्या राजकीय अनुभवाच्या आधारावर रजनीकांत यांना सक्रीय राजकारणात न शिरण्याचा सल्ला दिला आहे. अमिताभ 80 च्या दशकात काँग्रेसच्या तिकिटावर अलाहाबादमधून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. अमिताभ आणि रजनीकांत यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे.

Related posts: