|Monday, July 22, 2019
You are here: Home » क्रिडा » अलीम दारनी निवृत्तीची शक्यता फेटाळली

अलीम दारनी निवृत्तीची शक्यता फेटाळली 

वृत्तसंस्था/ दुबई

पाकिस्तानचे अव्वल पंच अलीम दार यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या पंचांच्या इलाईट पॅनेलमधून निवृत्त होत असल्याचे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले आहे. ‘2019 मध्ये होणाऱया आगामी आयसीसी विश्वचषक स्पर्धेपर्यंत पंच म्हणून काम पाहण्याचा माझा मानस आहे. मात्र, याबाबत आयसीसीनेच अंतिम निर्णय घ्यायचा आहे’, असे अलीम दार याप्रसंगी म्हणाले.

48 वर्षीय अलीम दार यांनी आजवर 100 पेक्षा अधिक कसोटी सामन्यात मैदानी पंच म्हणून सेवा बजावली. भारतातील विविध सामन्यातही ते अनेकदा पंच म्हणून काम पाहात आले आहेत. मात्र, गतवर्षी संपन्न झालेल्या भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतून त्यांना बाहेर व्हावे लागले होते.

‘पंच म्हणून काम पाहताना या जबाबदारीचा मी नेहमीच आनंद लुटत आलो असून आणखी किमान 2 वर्षे यातून निवृत्त होण्याचा माझा विचार नाही’, असे त्यांनी शुक्रवारी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ‘जागतिक क्रिकेटमध्ये अनेक तांत्रिक सुधारणा होत असताना रेफरल सिस्टीम व मॅच रेफ्रीमुळे सध्याचे खेळाडू अधिक निश्ंिचत असतात आणि मैदानी पंचांकडे पाहण्याचा त्यांचा रोखही बदलला आहे’, असे दार पुढे म्हणाले.

2011 विश्वचषक स्पर्धेत माझ्या निर्णयाविरोधात अनेकदा रेफरल घेतले गेले. पण, त्या प्रत्येक वेळी मी दिलेले निर्णय अचूक असल्याचे स्पष्ट झाले, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला. याशिवाय, ऍशेस मालिकेत मैदानी पंच म्हणून काम पाहण्याची संधी मिळाली, ते ही माझा उत्साह वाढवणारे होते, असे ते म्हणाले.

‘पाकिस्तानी पंचांसाठी ‘पे पॅकेज’ वाढवून मिळावे, ही माझी आधीपासून मागणी राहिली आहे. इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पंचांसाठी इतके उत्तम पॅकेज असतात की, त्यांना आयसीसीच्या इलाईट पॅनेलमध्ये येण्याची आवश्यकताही भासत नाही. मात्र, पाकिस्तानमध्ये तसे होताना दिसून येत नाही. पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱया पाकिस्तानमधील काही माजी कसोटीपटू व प्रथमश्रेणी खेळलेल्या खेळाडूंना यासाठी पीसीबीने अनुकूल वातावरण तयार करुन द्यायला हवे’, अशी सूचना त्यांनी शेवटी केली.