|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अथणी कन्नड शाळेतील धान्याची चोरी

अथणी कन्नड शाळेतील धान्याची चोरी 

वार्ताहर / अथणी

अथणी शहरातील विजापूर मार्गावर असणाऱया कन्नड प्राथमिक शाळेत तांदूळ व तूरडाळीची चोरी झाल्याची घटना 9 रोजी रात्री घडली. सदर प्रकार 10 रोजी सकाळी उघडकीस आला. या प्रकारातील सदर चोरटा तांदूळ व तूरडाळ विक्रीसाठी घेऊन जाताना नागरिकांना सापडला. त्यांनी तत्काळ चोरटय़ाला पोलिसांच्या स्वाधीन केले. पण त्यावेळी तो पळून जाण्यात यशस्वी झाला. सदर प्रकाराची फिर्याद मुख्याध्यापक एस. एम. रेड्डी यांनी अथणी पोलिसात दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील कन्नड शाळा गुरुवारी सायंकाळी बंद केल्यानंतर चोरटय़ाने तांदूळ व तूरडाळीची चोरी केली. त्यानंतर सदर माल 10 रोजी सकाळी विक्रीसाठी टाटा एसमधून घेऊन जात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यावेळी त्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यावेळी तो तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. सदर टाटा एस वाहनातून दोन पोती धान्य जप्त करण्यात आले आहे.

शाळेतील धान्य वारंवार चोरीला जात असल्याचा प्रकार घडत होता. पण त्याची माहिती मिळविण्यात अडचणीचे ठरत होते. सदर प्रकार उघडकीला आल्यानंतर गटशिक्षणाधिकारी एम. बी. बजंत्री यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सदर प्रकाराची माहिती वरिष्ठांना देण्यात आल्याचे सांगितले.

अनेक महिन्यांपासून धान्याची चोरी

गेल्या अनेक महिन्यांपासून धान्य चोरी होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. पण त्यामागे कोणाचा हात आहे याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. सदर चोरीच्या प्रकाराच्या माहितीचा अहवाल चिकोडीचे डीडीपीआय गजानन मन्नीकेरी यांना पाठविण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी बजंत्री यांनी सांगितले.

दोषींवर कारवाई होणार

शाळेतील आहार धान्याची चोरी करणे हा मोठा गुन्हा आहे. त्यात सहभागी असणाऱयांना कठोर शासन करण्यात येणार आहे. सदर घटनेतील दोषींचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे. दोषींवर कारवाई करताना कोणतीही गय केली जाणार नसल्याचे मध्यान्ह आहार अधिकारी दरुर यांनी सांगितले.

प्रतिष्ठीत व्यक्तीचा चोरीत सहभाग

शाळेतील धान्य हे विद्यार्थ्यांसाठी शासनाने दिले आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी. मुलांमध्ये शाळेची ओढ निर्माण व्हावी यासाठी शासन माध्यान्ह आहार विद्यार्थ्यांना देते. त्या धान्याचा सदुपयोग करण्याची जबाबदारी शाळा सुधारणा समितीच्या पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, माध्यन्ह आहार कर्मचारी यांची आहे. पण सदर चोरी प्रकरणात एका प्रतिष्ठीत व्यक्तीचा सहभाग असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. सदर व्यक्ती एका पक्षाची सक्रीय कार्यकर्ता आहेत. त्यांच्याकडूनच सदरचे कृत घडल्याचे बोलले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या आहारावर डल्ला मारणाऱयावर कठोर कारवाई होणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.