|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मराठीला बोलीभाषांनीच मोठेपण मिळवून दिले!

मराठीला बोलीभाषांनीच मोठेपण मिळवून दिले! 

चिपळुणातील अपरान्त साहित्य संमेलनात नामवंत विधीज्ञ ऍड. उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी /चिपळूण

भाषा व बोली भाषेत नेहमीच भेदभाव केला जातो. भाषा शुद्ध, तर बोली भाषा अशुद्ध असा गैरसमज पसरवून सांस्कृतिक अहंभावातून एकप्रकारे भेदभाव साधला जातो. मात्र भाषेइतकेच बोली भाषेलाही प्रमाण असून मराठी भाषेला तर विविध बोली भाषांनीच मोठेपण मिळवून दिले असल्याचे प्रतिपादन नामवंत विधीज्ञ ऍड. उज्ज्वल निकम यांनी येथे केले.

येथील लोटिस्मा व राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने शहरातील जुना कालभैरव मंदिराच्या पटांगणात आयोजित केलेल्या अपरान्त साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ऍड. निकम हे बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, सृष्टीतील सर्वात मोठी निर्मिती म्हणजे माणूस आहे. तसेच त्याला लाभलेली वाणी आणि शब्द हे वरदान आहे. त्यातच बोली भाषा हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक मार्ग असून बोली भाषेमुळेच प्रत्येकाच्या मनातील विचार स्पष्टपणे व साफपणे प्रकाशित होत असतात. बहिणाबाई चौधरींचे याविषयी खासकरून उदाहरण देता येईल. बोली भाषेची शैली, त्यातील हुंकार हा जीवनाला वेगळा आनंद देणार आहे. त्यासाठी अशा भाषांचे जतन होणे काळाची गरज आहे. त्यामुळे बोली भाषेचे संवर्धन हा विचार अंतरिम मनात येणे ही फार मोठी गोष्ट असून त्यासाठी साहित्य संमेलन भरवणे हादेखील तितकाच महत्वाचा भाग आहे.

वकिली क्षेत्रात काम करताना या गोष्टींचा नेहमीच बारकाव्याने विचार करावा लागतो. एवढेच नव्हे तर अनेकदा खटला चालवताना बोली भाषेचाच उपयोग होतो. मात्र आपण भाषा व बोली भाषेविषयी शुद्ध, अशुद्ध असा गैरसमज करून बसलो आहोत. म्होरं जा म्हटलं तर अशुद्ध मानतो. मात्र म्होरक्या हा शब्द शुद्ध मानला जातो. याचपद्धतीने गावठी आणि गावरान शब्दांचा वापर केला जातो. अगदी कोकणातील माणूस स्वतःला कोकणी म्हणतो आणि बाहेरच्या घाटी म्हणतो तसाच हा प्रकार असल्याचा टोलाही ऍड. निकम यांनी लगावला. यावरूनच कोणतीही भाषा अशुद्ध असत नाही हे मानले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर संमेलनाचे स्वागताध्यक्ष माधव भंडारी यांनी बोलताना सांगितले की, अपरान्त म्हणजे पश्चिमेकडचा प्रदेश असा अर्थ होतो. कोकण ही भूमीदेखील पश्चिम दिशेला असल्याने अपरान्तचा प्रदेश मानला जातो. मात्र मुळातच हा प्रदेश गोदावरीपासून सुरू होतो आणि केरळकडे संपतो. या भागाची निर्मिती भगवान परशुरामाने केल्याचे मानले जाते. तसे पाहिले तर बारा कोसांवर बदलत जाते. एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे जातानाही भाषेत बदल पडतो. कोकणात तर हा फरक प्रकर्षाने जाणवतो. मात्र भाषा स्थिर असते. त्यामुळे भाषा बदलण्याचा वेग फार कमी असतो. मात्र बोली भाषा बदलण्याचा वेग मोठा असतो. पूर्वी देवाला गऱहाणे घालतानादेखील बोली भाषेतील विविधता जाणवत असे.

एकूणच बोली भाषेतील सवयी व विविधता समजून घेणे आवश्यक आहे. याशिवाय अशा भाषांची नोंदही आवश्यक आहे. मूळ मराठी भाषेलादेखील आता धक्का पोहचू लागला आहे. त्याला महिलावर्गही तितकाच जबाबदार आहे. आपल्या मुलांना मराठीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 800 वर्षांपेक्षा अधिक इतिहास असलेली ही भाषा पुढील दीडशे वर्षे टिकवणेही कठीण बनले आहे. या गोष्टींचा विचारही होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

याशिवाय साहित्य परिषदेचे अध्यक्ष व संमेलनाध्यक्ष मिलिंद जोशी, उद्योजक मंदार जोगळेकर, नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास लोटिस्माचे अध्यक्ष अप्पा जाधव, प्रकाश देशपांडे, प्रकाश काणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन धनंजय चितळे यांनी केले.