|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » फेसबुक चॅटींग वादातून गमावला काकाने जीव

फेसबुक चॅटींग वादातून गमावला काकाने जीव 

 

पालीतील दयानंद चौगुलैंचा खून

घरात कोंडून जमावाकडून बेदम मारहाण

माफी मागूनही घरी बोलावले चर्चेसाठी

शिवसेना पदाधिकाऱयासह 5 जणांना अटक

प्रतिनिधी /रत्नागिरी

फेसबुकवरवरील चॅटींगवरून दोन कुटुंबात झालेला वाद मिटविण्याच्या नादात प्रकरण मारहाणीपर्यंत पोहचल्याने पालीतील एका तरूणाला हकनाक जीव गमवावा लागला. ऐन निवडणुक रणधुमाळीत शिवसेनेच्या एका पदाधिकाऱयाच्याच उपस्थितीत घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. ग्रामीण पोलिसांनी खूनाच्या गुन्हय़ांखाली या पदाधिकाऱयांसह 5 जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांची 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयानंद रमाकांत चौगुले (41, रा. साठरेबांबर, नवीन वसाहत, पाली) असे या घटनेत मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. या गुन्हय़ाखाली पोलिसांनी कुमार अशोक शिंदे, महेश अशोक शिंदे, किशोर अशोक शिंदे, प्रणय गिरीधर शिंदे, तसेच पं.स.सदस्य महेंद्र झापडेकर यांना अटक केली. या घटनेत मृत झालेले दयानंद चौगुले यांचा पुतण्या चिन्मय रामचंद्र चौगुले हा एका स्कूलबसवर चालक आहे. त्याचे चांदेराईतील एका मुलीशी फेसबुकवरून चॅटींग होत असे. ही बाब त्या मुलीच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आली. त्या बाबत मुलीच्या नातेवाईकांनी त्या चॅटींगबाबत विचारणा करून जाबही विचारला. त्यामध्ये चिन्मय चौगुलेचे नाव समोर आल्यानंतर नातेवाईकांचा संताप झाला.

या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी चांदेराईतील त्या मुलीच्या कुटुंबियांनी पाली येथे चिन्मयच्या घरी जाऊन जाब विचारला होता. चिन्मयच्या कुटुंबियांनी त्या विषयी माफीही मागितली. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी त्याला चांदेराई येथे बोलावण्यात आले. त्याप्रमाणे चिन्मयचे नातेवाईक चांदेराई येथे भेटायला गेले होते. या भेटी दरम्यान चौगुले कुटुंबियांना शिंदे बंधूनी जाब विचारला. त्यावेळी शब्दाला शब्द वाढत गेला. चॅटींगचा वाद मिटण्याऐवजी चौगुले व शिंदे कुटुंबियात जोरदार बाचाबाची झाली. हे प्रकरण मिटवण्यासाठी पंचायत समिती सदस्य महेंद्र झापडेकरही उपस्थित होते. ते हजर असतानाच चौगुले कुटुंबियांना शिंदे कुटुंबियांना घरात बंद करून बेदम मारहाण केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

ही हाणामारी टोकाला गेली. त्यामध्ये दयानंद चौगुले यांना गंभीर स्वरूपाचा मार बसला. प्रकृती अत्यवस्थ बनल्याने दयानंद चौगुले यांना ताबडतोब चांदेराई येथील प्राथमिक रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र वैद्यकीय सूत्रांनी केलेल्या तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

या बाबतची खबर मिळताच ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनीही तत्काळ आपल्या सहकाऱयांसह धाव घेतली. पोलिसांनी त्यानंतर आरोपींना जेरबंद करण्यासाठी रातोरात सूत्रे हलवली. दयानंद यांचे भाऊ रामचंद्र रमाकांत चौगुले (46, रा. साठरेबांबर नवीन वसाहत, पाली) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात याबाबतची तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी भा.दं.वि.क. 343, 303, 143, 147, 323, 504 नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. त्या सर्वांना न्यायालयासमोर शनिवारी हजर करण्यात आले होते. न्यायालयाने पाचही जणांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या बाबत अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.