|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कठोर कायद्यापेक्षा अंमलबजावणी महत्वाची

कठोर कायद्यापेक्षा अंमलबजावणी महत्वाची 

 

उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी /चिपळूण

केवळ कायदा कठोर असून चालत नाही, तर त्याची अंमलबजावणीदेखील कठोर होणे आवश्यक आहे. देशातील पोलीस यंत्रणा आजही अपडेट नाही. प्रत्येक गुन्हय़ाचा तपास पारंपरिक पद्धतीनेच केला जात असल्याचे ख्यातनाम सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित अपरान्त साहित्य संमेलनासाठी आलेल्या ऍड. निकम यांनी पत्रकारांशी मनमोकळय़ा गप्पा मारल्या.

ते पुढे म्हणाले की, मुंबईत पूर्वीपेक्षा संघटित गुन्हेगारीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. मोबाईल व दूरध्वनीसारखी यंत्रणा सर्व्हरच्या नियंत्रणाखाली असल्याने साहजिकच गुन्हेगारीवर नियंत्रण राहण्यास मदत झाली आहे. तसे पाहिले तर इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्रात चांगली परिस्थिती आहे, असे म्हणावे लागेल. मुळात गुन्हय़ांचा तपास करणाऱया पोलीस यंत्रणेवर अनेक जबाबदारी असून विविध विभागातील कामे पोलीस यंत्रणेला करावी लागत आहेत. त्यातच पोलिसांची संख्याही खूप कमी आहे. मात्र याउलट गुन्हेगारी करणाऱयांची संख्या वाढती आहे. गुन्हेगाराला एकदा शिक्षा झाली तर दुसऱयांदा करणार नाही, असे होत नाही. बऱयाचदा सुशिक्षित लोकांकडूनच गुन्हे होताना दिसतात. यावर संस्कृती हाच उपाय असून आपली भारतीय संस्कृती टिकून राहणे आवश्यक आहे.

1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यानिमित्त आपण सागरी किनाऱयाची पाहणी केली होती. मात्र भारताचा सागरी किनारा इतका विस्तीर्ण आहे की, वैयक्तिक सुरक्षा देणे कठीण आहे. त्यासाठी नागरिकांनीच जागरूक राहणे आवश्यक आहे. अगदी कोकण किनारपट्टीच्या नागरिकांनीही जागरूकता दाखवणे आवश्यक आहे. देशात सीआयडीची यंत्रणा असली तरी तीही सक्षम करणे आवश्यक आहे. मात्र जे लोक काम करत नाहीत, त्यांची सीआयडीमध्ये भरती केली जाते. त्यांच्याकडेही तेवढी यंत्रणा नसल्याचे निकम यांनी स्पष्ट केले. यावेळी लोटिस्माचे प्रकाश देशपांडे, साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी, मंदार जोगळेकर, प्रकाश काणे आदी उपस्थित होते.

Related posts: