|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » राष्ट्रीय लोकअदालतीत 329 प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीत 329 प्रकरणे निकाली 

ओरोसराष्ट्रीय लोकअदालतीत जिल्हय़ातील विविध न्यायालयांमध्ये दाखल व दाखलपूर्व अशा मिळून 329 प्रकरणांमध्ये शनिवारी समझोता झाला. विधी सेवा प्राधिकरण विभागामार्फत जिल्हय़ातील सर्व न्यायालयांमधून लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. आपापसातील वादांना तडजोडीने पूर्णविराम देण्यासाठीच्या या लोकअदालतीत सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा न्यायालयासह एकूण आठ न्यायालयांमध्ये दाखलपूर्व एक हजार 842 व दाखल एक हजार 793 अशी एकूण तीन हजार 635 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी दाखल पूर्व 182 प्रकरणांमध्ये समझोता झाला असून यामधून 27 लाख 38 हजार 46 रुपये वसूल करण्यात आले. तर दाखल प्रकरणांपैकी 147 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून यामधून 90 लाख 15 हजार 72 रुपये वसूल करण्यात आले.

सिंधुदुर्गनगरी येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वि. वि. विरकर, सिंधुदुर्ग जिल्हा न्याय व विधी प्राधीकरणचे सदस्य सचिव तथा मुख्य न्यायादंडाधिकारी आर. व्ही. हुद्दार यांच्या अध्यक्षतेखालील दोन मंडळांमधून ही लोकअदालत घेण्यात आली. यामध्ये ऍड. श्रीमती व्ही. व्ही. पांगम, ऍड. व्ही. आर. पांगम, ऍड. यतीश खानोलकर, ऍड. अश्पाक शेख, ऍड. व्ही. जे. खान, सुप्रिया मेहता यांनी पंच म्हणून काम पाहिले.

न्यायालय व्यवस्थापक प्रशांत माळकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, तर जिल्हा सरकारी अभियोक्ता सूर्यकांत खानोलकर यांनी लोकन्यायालयाची महती विशद केली.

Related posts: