|Saturday, December 15, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘अण्णाद्रमुक’मधील सत्तासंघर्ष सुरूच

‘अण्णाद्रमुक’मधील सत्तासंघर्ष सुरूच 

पन्नीरसेल्वम यांना आणखी पाच खासदारांचा पाठिंबा, 127 आमदारांचा पाठिंबा असल्याचा शशिकलांचा दावा

वृत्तसंस्था/ चेन्नई

अण्णाद्रमुक पक्षाच्या महासचिव शशिकला व तामिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांच्यातील सत्तासंघर्ष रविवारी अधिक तीव्र झाला. आणखी पाच खासदारांनी पन्नीरसेल्वम यांना पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, शशिकला यांनी आपल्याकडे 127 आमदार असल्याचा दावा केला. आम्हाला बहुमत सिद्ध करण्याची संधी नाकारल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा शशिकला समर्थकांनी दिला आहे. राज्यपाल विद्यासागर राव सोमवारी कोणता निर्णय घेणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जयललिता यांचे 5 डिसेंबर 2016 रोजी निधन झाले. ओ. पनीरसेल्वम हे मुख्यमंत्री झाले. पक्षाची सूत्रे शशिकला यांच्याकडे आली. 31 डिसेंबर 2016 रोजी त्यांनी पक्षाचे महासचिव पद स्वीकारले. त्यांची एकमताने विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली होती. मात्र, पन्नीरसेल्वम यांनी बंडाचा झेंडा हाती घेत त्यांच्या नेतृत्त्वाला आव्हान दिले. तेव्हापासून राजकीय घडामोडी कमालीच्या वेगावल्या आहेत. 

‘आमदारांची संख्या तुम्हीच मोजा’

शशिकला यांनी आपल्याकडे 127 आमदार असल्याचा दावा रविवारी केला. आपल्या समर्थक आमदारांचे वास्तव्य असलेल्या ‘गोल्डन बे रिसॉर्ट’मध्ये त्यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना जाण्याची परवानगी दिली. समर्थक आमदारांना डांबून ठेवण्यात आलेले नाही. ते मुक्त आहेत. विरोधी पक्ष अफवा पसरवत असून, तुम्ही समर्थक आमदरांची संख्या मोजावी, असेही आवाहन त्यांनी माध्यम प्रतिनिधींना केले. आम्हीच बहुमत सिद्ध करू, तुम्ही फक्त ‘थांबा आणि पाहा’, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदारांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधणे टाळले.

  काहींना राजकारणात महिला सहन होत नाहीत : शशिकला

जयललिता यांनी 33 वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले होते. मी ही त्यांच्याबरोबर विविध आव्हानांचा सामना केला आहे. काही जणांना राजकारणात महिला सहन होत नाहीत, असा टोला शशिकला यांनी पन्नीरसेल्वम यांना लगावला. माझ्यासाठी संघर्ष नवा नाही. या आव्हानांमधून आम्हीच सरकार स्थापन करू. अण्णाद्रमुक पक्षामध्ये फूट पडणार नाही. यापुढील साडेचार वर्ष आमचेच सरकार असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माझ्याविषयी पन्नीरसेल्वम यांचा गट समाजमाध्यमांवरून अफवा पसरवत आहे, असा आरोपही त्यांनी केला. रविवारी केवळ पाच वाहनांचा ताफा घेऊन शशिकला ‘गोल्डन बे रिसॉर्ट’मध्ये असणाऱया समर्थक आमदारांना भेटण्यासाठी गेल्या. शनिवारी तब्बल 35 वाहनांचा ताफा त्यांच्याबरोबर होता. त्यामुळे हाही चर्चेचा विषय ठरला आहे.

सर्वांचे लक्ष राज्यपालांच्या निर्णयाकडे 

शशिकला यांच्यासह रिसॉर्टमध्ये थांबलेल्या आमदारांना राज्यपाल विद्यासागर राव यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. शशिकला यांनी शनिवारी राज्यपाल विद्यासागर राव यांना पत्राद्वारे सरकार स्थापनेचा दावा केला होता. तसेच ‘गोल्डन बे रिसॉर्ट’मध्ये जाऊन समर्थक आमदारांची भेटही घेतली होती. मात्र शशिकला यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे आता राज्यपाल कोणता निकाल देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. सोमवारी राज्यपालांना याप्रश्नी तोडगा काढावा लागेल. अन्यथा राज्यघटनेच्या कलम 32नुसार याप्रकरणी याचिका दाखल होऊ शकते, अशी माहिती भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिली.

Related posts: