|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » उदयराव जोशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

उदयराव जोशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

प्रतिनिधी / गडहिंग्लज

अत्याळकरांमुळेच माझी राष्ट्रवादी पक्षातर्फे उमेदवारी निश्चित झाली आहे. तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन कडगाव-गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सतीश पाटील यांनी अत्याळ येथील प्रचारसभेत केले. अध्यक्षस्थानी पांडुरंग पाटील होते.

सतीश पाटील यांनी पुढे बोलताना, राष्ट्रवादीने संपूर्ण तालुक्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली आहे. अशी फळी इतर कोणत्याही पक्षात नाही. त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. अनेक आमिषे दाखवून फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. त्यांना अजिबात थारा देऊ नका. मतदारसंघात विकासाची गंगा राष्ट्रवादीने आणली आहे. त्या गंगेला वाहते ठेवण्यासाठी अत्याळकरांच्या पाठींब्याची गरज आहे. आजपर्यंत अत्याळकरांनी राष्ट्रवादी पक्षावर मोठा विश्वास दाखविला आहे. त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता हा आधार असल्याने त्यांना कोणत्याही गाष्टीची कमी भासू देणार नाही याची हमी देतो. या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षातील उमेदवारांना भरघोस मतदान करून त्याचा विजयाचा हिस्सा बना असे आवाहन यावेळी सतीश पाटील यांनी केले.

गडहिंग्लज, चंदगड तालुक्य़ात विकासकामाची परंपरा ही राष्ट्रवादी पक्षाकडून शिकावी. स्व. बाबा कुपेकर यांनी विकासाचा पाया घातला. त्यावर आमदार हसन मुश्रीफ यांना कळस चढविला. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांना कोणतीही अडचण नाही. विरोधकांच्यात आता आचारी जास्त झाल्याने जेवणात चव राहिली नाही. आमचा आचारी एकच असल्याने जेवण दर्जेदार होणार. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाबरोबर रहा, असे प्रतिपादन संघटक उदय जोशी यांनी केले. पंचायत समितीचे उमेदवार सुजित देसाई यांनी, अत्याळकर ही राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. नवख्या उमेदवाराला मदत करून त्यांना विजयी करा असे आवाहन केले. यावेळी जि. प. सदस्या शैलजाताई पाटील, सदानंद पाटील (कडगाव), डॉ. डायस, माजी नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरी, एस. आर. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी पांडुरंग पाटील (अत्याळ), तानाजी मोहिते, दिपक घोरपडे, मारूती पाटील, विजय मोहिते, मिलिंद मगदूम (बेळगुंदी), सचिन देसाई (हिरलगे), विकास पाटील, बाळासाहेब माने, जयसिंग पाटील, सयाजी देसाई, आप्पासाहेब पाटील, पी. जी. पाटील आदींसह मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत शाहीर शंकर पाटील, दिपक कांबळे यांनी तर आभार विजय मोहिते यांनी मानले.