|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दत्तप्रकाश फाऊंडेशनतर्फे शिवणेखुर्द हायस्कूलला पुस्तके भेट

दत्तप्रकाश फाऊंडेशनतर्फे शिवणेखुर्द हायस्कूलला पुस्तके भेट 

प्रतिनिधी/ राजापूर

शिवणेखुर्द शाळेच्या नावातच उत्कर्ष आहे. शिवाय या शाळेमध्ये आपण स्वतः एक वर्ष सेवा बजावली आहे. आता या शाळेला मदतीसाठी दत्तप्रकाश फाऊंडेशन सारख्या संस्था पुढे येत असल्याने या शाळेचा भविष्यात नक्कीच उत्कर्ष होईल असा आशावाद दै.तरूण भारतचे राजापूर प्रतिनिधी सुंदर पाटणकर यांनी व्यक्त केला.

राजापूर तालुक्यातील दत्तप्रकाश फाऊंडेशन सोगमवाडी या संस्थेच्या वतीने राजापूर तालुक्यातील उत्कर्ष विद्यामंदिर शिवणेखुर्द या माध्यमिक शाळेला पुस्तके भेट देण्यात आली. ही पुस्तके प्रदान करताना ते बोलत होते. राजापूर तालुक्यातील दत्तप्रकाश फाऊंडेशन सोगमवाडी या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध संस्थांना शैक्षणिक मदत केली जाते. यामध्ये शालोपयोगी वस्तूंसह ग्रंथालय पुस्तके, संगणक आदी साहित्यांचा समावेश असतो. यावर्षी या संस्थेच्या वतीने उत्कर्ष विद्यामंदिर शिवणेखुर्द या माध्यमिक शाळेला सुमारे 50 पुस्तकांची देणगी देण्यात आली. दै.तरूण भारतचे राजापूर प्रतिनिधी सुंदर पाटणकर व जैतापुरातील नारकर इलेक्ट्रॉनिक्सचे सचिन नारकर यांच्या हस्ते ही पुस्तके नुकतीच प्रशालेचे शिक्षक साताप्पा मकदूम यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.

 या संस्थेचे अध्यक्ष ऍड.संतोष झिंबरे व सचिव सुभाष झिंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या माध्यमिक शाळेमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात ही पुस्तके देण्यात आली. यावेळी दत्तप्रकाश फाऊंडेशनचे अध्यक्ष ऍड.संतोष झिंबरे यांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी देण्यात आलेल्या पुस्तकांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करताना अशा प्रकारची अजूनही पुस्तके देण्याचा मानस व्यक्त केला. तर सचिन नारकर यांनी यावेळी आपणही एका शैक्षणिक संस्थेचा सचिव असल्याचे सांगत उपस्थित असलेल्या मुलांना कशा प्रकारे अभ्यास करावा याबाबत थोडक्यात माहिती दिली. तसेच आपल्याकडून काही मदत लागल्यास शाळेने आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.