|Saturday, May 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मतदानावर बहिष्काराचे अस्त्र उगारताच ‘नरभक्षक’ जेरबंद

मतदानावर बहिष्काराचे अस्त्र उगारताच ‘नरभक्षक’ जेरबंद 

सदानंद सतरकर, लखनौ

लखनौमध्ये उतरताच निवडणुकीच्या बातम्यांबरोबर आलेल्या एका बातमीने आमचे लक्ष वेधून घेतले. मुस्तफाबाद पिलीभीत या राज्याच्या उत्तरेकडील आदिवासी भागांमध्ये एका नरभक्षक वाघाने चार महिन्यांमध्ये सहा लोकांचे बळी घेतल्याचे ते वृत्त होते. मागील काही महिने या वाघाच्या दहशतीखाली असलेल्या तेथील स्थानिकांनी या घटनेकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी निवडणुकीचे हत्यार वापरीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. त्यामुळे झटपट हालचाली सुरू झाल्या व शनिवार 11 रोजी सायंकाळी वनखात्याच्या एका खास पथकाने या नरभक्षकाला जेरबंद केले. या घटनेच्या उत्सुकतेपोटी पाठपुरावा केल्यानंतर येथील वन्यप्राणी व आदिवासी लोकांमधील संघर्षांच्या काही गोष्टी लखनऊ प्राणीसंग्रहालयाचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक वार्ताहरांकडून समजल्या.

पिलीभीत जिल्हा व कलीनगर तालुक्यामधील नवदीया हे आदिवासी गांव. नवदीया व बाजूच्या पुरनपूर गावांमध्ये या नरभक्षक वाघाने गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून दहशत माजवली आहे. या ठिकाणी एका विशिष्ट आदिवासी समाजातील लोकांचे वास्तव्य आहे. ऊस, गहू व अन्य पिकांची शेती हे या भागातील आदीवासींचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. पिलीभीत हा उत्तरीय हिमालयीन डोंगररांतून उत्तरप्रदेशपर्यंत (नेपाळच्या बाजूने) पसरलेला घटदाट जंगल पट्टा. पिलीभीतच्या आदीवासी वस्तीला लागूनच हे जंगल असून इंग्रजी यू आकारात हा विस्तारलेला जंगल पट्टा आहे. स्थानिक आदीवासींची शेती व त्याला लागूनच हे जंगल (बफर झोन) सुरू होतो. वाघ व अन्य विविध प्रकारचे हिंस्र प्राणी या जंगलात सापडतात. गेल्या नोव्हेंबर महिन्यात लोकवस्तीमध्ये शिरलेल्या या वाघाने घरात शिरुन पहिला नरबळी घेतला. त्यानंतर अशा भयंकर घटनांचे सत्रच सुरू झाले.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होण्याच्या काही दिवसांपूर्वीच सहावी घटना या भागात घडली. एका युवकाला घरात घुसून या वाघाने ठार केल्यानंतर दहशतीखाली सापडलेल्या स्थानिकांनी अखेरचा उपाय म्हणून प्रशासनाला जाग आणण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा जाहीर इशारा दिला. त्यामुळे  प्रशासकीय पातळीवर झटपट हालचाली सुरू झाल्या. लखनऊहून वनखात्याचे एक खास पथक या वाघाच्या बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले. लखनऊ प्राणी संग्रहालयाचे उपसंचालक डॉ. उत्कर्ष शुक्ला यांच्या नेतृत्त्वाखाली या जंगलात विशेष कृती मोहीम राबविण्यात आली. पाच दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर वाघाला जेरबंद करण्यात पथकाला यश आले.

जेरबंद करण्यात आलेल्या या नरभक्षक वाघाला संतप्त ग्रामस्थांनी लाठय़ाकाठय़ा व दगडांनी बदडण्याचा प्रयत्न केला. पण वनखात्याने विशेष सुरक्षेत शनिवारी रात्रीच त्याला लखनऊमधील नवाब वजिद अली शाह प्राणीसंग्रहालयात हलविले. सध्या तो याठिकाणी सुरक्षित आहे. वनखात्यामध्ये गेली अनेक वर्षे अशा नरभक्षक वाघांना पकडण्याचा मोहिमा यशस्वीपणे राबविलेले डॉ. शुक्ला यांच्याकडून काही धक्कादायक माहिती ऐकायला मिळाली. पिलीभीत व लखीमपूर जिल्हय़ांमध्ये अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. शेतीकाम व सरपणाच्या लाकूडफाटय़ासाठी येथील आदिवासींच्या जंगलातील वावरामुळे येथील ग्रामस्थ व जंगली प्राण्याच्या आमने सामने येण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. तस्करीसाठी वाघांची होणारी शिकार, जंगलाचा वाढता संहार अशा घटनांमुळे दिशाहीन होणारे असे हिंस्र प्राणी लोकवस्तीकडे वळत आहेत.

 वनखात्याने जेरबंद केलेले साधारण दहा ते अकरा वाघ सध्या लखनऊ प्राणीसंग्रहालयात आहेत. याशिवाय त्यांचे बछडेही आहेत. येथील प्राणीसंग्रहालयात एका वाघावर दरवर्षी साधारण रु. 10 लाख खर्च करावे लागतात. चार महिन्यात सहा माणसांचे बळी घेईपर्यंत येथील प्रशासन सुस्त होते. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा स्थानिकांच्या निर्णयामुळे सरकारला थोडीशी जाग आली तेवढीच…!

Related posts: