|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नियोजनाच्या अभावातून पार्किंग रस्त्यावरच

नियोजनाच्या अभावातून पार्किंग रस्त्यावरच 

वार्ताहर/ निपाणी

निपाणी शहराला विभागून जाणारा मुख्य मार्ग म्हणून जुन्या पुणे-बेंगळूर मार्गाकडे पाहिले जाते. व्यावसायिक स्पर्धेतून येथे होणारे अतिक्रमण व वाहनांचे अनियमित पार्किंग वाहतूक कोंडीसह अपघाताला कारण ठरत आहे. यासाठी पालिका प्रशासनाने पार्किंगच्या नियोजनासाठी पांढरे पट्टे मारले आहेत. पण या निर्धारित केलेल्या जागेत पार्किंग करण्याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे नियोजनाच्या अभावातून पार्किंग रस्त्यावर असे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

निपाणी शहर व उपनगरांची व्याप्ती झपाटय़ाने वाढत आहे. वाढणारी व्याप्ती व्यावसायिक प्रगतीची द्वारे खुली करत आहे. पण वाढणारे व्यावसायिकीकरण हे व्यावसायिक स्पर्धेचे कारण ठरत आहे. यासाठी जुना पुणे-बेंगळूर मार्ग अतिक्रमणमुक्त करताना खुला करण्याचे आव्हान पालिका प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. यापूर्वी ही गरज लक्षात घेऊन पालिकेने अतिक्रमण हटाओ मोहीम राबविली. पण यानंतर या मुख्य मार्गावर पुन्हा व्यावसायिक अतिक्रमणाने आणि बेभरवशाच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर टाकली आहे. अतिक्रमणातून पादचाऱयांच्या हक्काचे पदपथही गायब झाले आहेत.

पालिकेची अतिक्रमण हटाओ मोहीम हवेत

पालिका प्रशासन व पदाधिकाऱयांनी गेल्या महिन्यात अतिक्रमण हटाओ मोहीम राबविण्याची घोषणा केली. पण ही घोषणा हवेत विरून जाताना अतिक्रमण हटाओ कारवाई थांबली. गेल्या चार दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाने या मुख्य मार्गावर काही ठिकाणी पार्किंग नियोजन करण्यासाठी मार्गाच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे आखले. पण आखण्यात आलेल्या पट्टय़ाच्या आत कोणतेही वाहन थांबविले जाऊ नये याची कार्यवाही करणे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे. पण यावर कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. यातून पट्टे रस्त्यावर वाहने पट्टय़ावर असे चित्र दिसून येत आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी पार्किंग नियोजन महत्त्वाचे आहे. असे असले तरी पालिका व पोलिस प्रशासनाचा यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. पदपथ खुले करून पार्किंग नियोजन सुरळीत झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या निकालात निघण्यास मदत होणार आहे. वाहनधारक व व्यावसायिकांनीही यासाठी आपली जबाबदारी ओळखून वाहनांचे पर्किंग करणे व करायला लावण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे.

 

Related posts: