|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जे क्षेत्र निवडाल, त्यात सातत्याने काम करा!

जे क्षेत्र निवडाल, त्यात सातत्याने काम करा! 

कुडाळ : रंग, रुप व सौंदर्य या गोष्टी आपल्याला जन्माने मिळतात. परंतु आपले कर्तृत्व जन्माने मिळत नाही, तर ते जन्माला घालावे लागते. आपल्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन रुजवून आपले कर्तृत्व सिद्ध करून कर्तृत्वाला सौंदर्याची धार देता आली, तर तुम्ही तुमच्या कामातून, वागण्यातून आजूबाजूला एकप्रकारची ऊर्जा देऊ शकता. इतरांवर प्रभाव पाडू शकता, असे अभिनेत्री ईला भाटे यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

येथील बॅ. नाथ पै बी. एड कॉलेज व बॅ. नाथ पै महिला कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. अभिनेते डॉ. गिरीश ओक, नाटय़लेखक आनंद म्हसवेकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, बी. एडचे प्राचार्य परेश धावडे व महिला कला-वाणिज्य-विज्ञान महिला महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी उपस्थित होते.

श्रीमती भाटे म्हणाल्या, एखाद्या ठिकाणी तन्मयतेने, समाधानाने काम करण्यासाठी एक क्षेत्र प्रत्येक व्यक्तीला हवे असते. ते शोधण्यासाठी दृष्टी प्राप्त करा. जे क्षेत्र निवडाल, त्यात सातत्याने काम करा. स्वतःचे योगदान द्या.

डॉ. ओक म्हणाले, आपण बॅ. नाथ पै शिक्षण संस्था परिवारातीलच एक सदस्य असून माझ्या आजूबाजूला असणारी दिग्गज मंडळी या संस्थेत आणण्याचा आपला प्रयत्न असतो. या लोकांनी आपले कर्तृत्व कसे घडविले, त्यांचा जीवन प्रवास कळावा व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हा त्यामागे उद्देश असतो.

म्हसवेकर म्हणाले, या महाविद्यालयाची वास्तू, आजूबाजूचे वातावरण यामध्ये जबरदस्त सकारात्मक लहरी आहेत. ज्याने आपण सुखावून गेलो. पहिल्यापासून वाचनाची प्रचंड आवड असल्याने खूप पुस्तके, नाटके वाचत गेलो. त्यातूनच लिहिण्याची आवड निर्माण झाली. सध्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे निकाल लागले की, निराशेने विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना पाहायला, ऐकायला मिळतात. सकारात्मकतेचा अभाव या घटनांमागे जाणवतो. त्यामुळे शिक्षण देताना विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत.

मान्यवरांच्या हस्ते 2014-15 या शैक्षणिक वर्षात बी. एड. च्या विद्यार्थिनी वृंदा पावनोजी, सारिका घाडी व तृप्ती मडव यांनी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होऊन प्रथम तीन क्रमांक मिळविल्याबद्दल, तर वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी समीक्षा परब, प्रतीक्षा गोसावी व प्राची पिंगुळकर यांचाही प्रथम तीन क्रमांक प्राप्त केल्याबद्दल गौरव करण्यात आला. तसेच वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व चषक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. आदर्श विद्यार्थिनी म्हणून नम्रता फडके हिची निवड व सन्मान करण्यात आला. अष्टपैलू खेळाडू म्हणून वृषाली कुडाळकर हिला सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री वाळके व बी. एड. विद्यार्थिनी उमा जडये, तर आभार गीतांजली बिर्जे यांनी मानले. बी. एड् कॉलेजच्या प्रा. अनुष्का रेवंडकर यांनी स्वागत केले. वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. मराठे उपस्थित होत्या. सर्व अभ्याक्रमातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

 

 

Related posts: